खेलो इंडिया 2020 : महाराष्ट्राने उघडले पदकांचे खाते, सिद्धी हात्तेकरने पटकावले रौप्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 09:02 PM2020-01-09T21:02:26+5:302020-01-09T21:03:01+5:30
सिद्धी हात्तेकरने १७ वर्षाखालील विभागाच्या सर्वसाधारण गटात रौप्यपदक जिंकले
गुवाहटी : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व करणा-या औरंगाबादच्या सिद्धी हात्तेकरने १७ वर्षाखालील विभागाच्या सर्वसाधारण गटात रौप्यपदक जिंकले आणि आसाम गुवाहटी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा २०२० महोत्सवात राज्याचे खाते उघडले.
सिद्धी या १५ वर्षीय खेळाडूने गतवर्षी याच प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. त्याच यशाची तिने पुनरावृत्ती केली. तिने यंदा ४१.९० गुणांची कमाई केली. त्रिपुराच्या प्रियांका दासगुप्ताने ४२.६० गुणांसह सुवर्णपदक जिंकले. तेलंगणाच्या पी.सुरभि प्रसन्नाने ३९.८५ गुणांसह ब्राँझपदक पटकाविले. महाराष्ट्राच्या इशिता रेवाळे व सानिका अत्तरदे यांना अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळाला.
सिद्धीने रुपेरी यशाबाबत समाधान व्यक्त करीत सांगितले, मी सुवर्णपदक मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र थोडक्यात माझे सुवर्णपदक हुकले. आता वैयक्तिक साधनांच्या प्रकारात मी सुवर्णपदक मिळवण्यावर लक्ष केंद्रीत करीत आहे. सिद्धी हिने वयाच्या सातव्या वर्षांपासूनच रामकृष्ण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाच्या सरावास प्रारंभ केला. सिद्धीने कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे.
मुलांच्या १७ वषार्खालील गटात महाराष्ट्राला पदकाने हुलकावणी दिली. ओंकार धनावडे याला सर्वसाधारण विभागात चौथा क्रमांक मिळाला. त्याचे ६५.७५ गुण झाले. जतीन कनोजिया (उत्तरप्रदेश- ६८.९० गुण), तुषार कल्याण (दिल्ली-६७.५० गुण) व सेरीफ (उत्तरप्रदेश- ६६.९५ गुण) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व ब्राँझपदक मिळविले.