खेलो इंडिया 2020 : कुस्तीत विजय, पृथ्वीराज यांना सुवर्ण, बॅटमिंटनमध्ये आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 08:48 PM2020-01-19T20:48:23+5:302020-01-19T20:48:40+5:30

खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात कुस्ती स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने २१ वर्षांखालील गटात दोन सुवर्ण, तीन रौप्यपदके मिळविली.

Khelo India 2020: In wrestling Vijay Patil and Prithviraj won gold | खेलो इंडिया 2020 : कुस्तीत विजय, पृथ्वीराज यांना सुवर्ण, बॅटमिंटनमध्ये आगेकूच

खेलो इंडिया 2020 : कुस्तीत विजय, पृथ्वीराज यांना सुवर्ण, बॅटमिंटनमध्ये आगेकूच

Next

खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात कुस्ती स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने २१ वर्षांखालील गटात दोन सुवर्ण, तीन रौप्यपदके मिळविली. दोन्ही सुवर्णपदके मुलांच्या गटात विजय पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी मिळविली. मुलींच्या गटात प्रतिक्षा देबाजे, विश्रांती पाटील, प्रतिक्षा बागडी यांनी रौप्यपदकाची कमाई केली.

लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेच्या हॉलमध्ये संपन्न झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राला २१ वर्षांखालील गटात हरियाणा पाठोपाठ दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले. दिल्ली तिस-या स्थानावर राहिले. स्पर्धेतील १७ वर्षांखालील गटात हरियाणाने विजेते, तर दिल्लीने उपविजेतेपद मिळविले. महाराष्ट्राला या वयोगटात तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले.
अखेरच्या दिवसातील स्पर्धा या बहुतेक कुस्त्या नॉर्डिक पद्धतीने झाल्या. यातही महाराष्ट्राच्या विजय पाटील याने आपली छाप पाडली. गटातील पंजाबचा साहिल, दिल्लीचा परवेश, आसामचा रामबीर यांच्यावर १०-० असा तांत्रिक विजय मिळविला. विशेष म्हणजे अंतिम लढतीतही त्याने हरियाणाच्या हितेशवर वर्चस्व राखताना असाच तांत्रिक विजय मिळविला. विजय मुळचा कोल्हापूरचा असला, तरी तो पुण्यात सह्याद्री संकुल येथे विजय बराटे यांच्याकडे मार्गदर्शन घेतोय. पृथ्वीराजनेही नॉर्डिक पद्धतीनेच झालेल्या लढतीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

मुलींच्या गटात ७६ किलो वजन प्रकारात उपांत्य लढतीत मध्य प्रदेशाच्या अमेरीविरुद्ध ०-६ अशी मागे पडल्यानंतरही प्रतिक्षा बागडी हिने अखेरच्या टप्प्यात ढाक डावावर अमेरीला चीतपट करून अंतिम फेरी गाठली. मात्र, अंतिम फेरीत तिला हरियानाच्या करुणाचा सामना करता आला नाही. प्रतिक्षाच्या खेळाची चांगली जाण असणा-या करुणाने तिला फारशी संधी दिली नाही. तिला जखडून ठेवत कुस्ती बाहेर घेत तिने एकेक गुण मिळवत विजय मिळविला. त्यापूर्वी ५७ किलो वजन गटातही प्रतिक्षा देबाजे ही उत्तर प्रदेशाच्या भारतीला आव्हान देऊ शकली नाही. स्पधेर्तील अखेरच्या ६२ किलो वजन प्रकारात महाराष्ट्राची विश्रांती पाटिल पंजाबच्या लोवलीनला आव्हान देऊ शकली नाही. ताकद आणि उंचीचा अचूक फायदा उठवून लोवलीन हिने विश्रांतीवर मात केली.

देशी खेळांचा वारसा जपणारे देबाजे घराणे
प्रतिक्षा देबाजे या शिरोळ गावच्या मुलीला आज रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असले, तरी तिला देशी खेळांचा वारसा जपत असल्याचा अभिमान वाटतो. देबाजे घराण्याची सहावी पिढी प्रतिक्षा आणि तिचा भाऊ सर्वोदय कुस्तीत नाव कमवत आहे. दोघे राष्ट्रीय स्तरावरील मल्ल आहेत. विशेष म्हणजे सर्वोदयला जिम्नॅस्टिकची देखील आवड आहे. वडिल संजय हे स्वत: श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यात कुस्ती, मल्लखांब या खेळांबरोबरच जिम्नॅस्टिकचे मार्गदर्शन करतात. गावातील मुली कुस्ती खेळण्यास तयार होत नसल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला आधी घडवले आणि गावातील मुलींनी प्रेरित केले. यामुळे केवळ प्रतिक्षाच घडली नाही, तर आज गावातील २० ते २२ मुली सराव करतात.

गावातील केंद्रावर जोड मिळू न शकत नसल्यामुळे प्रतिक्षा मुरगुडला दादासाहेब लवाटे यांच्याकडे मंडलिक कुस्ती संकुलात दाखल झाली. तेव्हापासून तिचा प्रगतीचा आलेख उंचावत गेला. दोन वर्षाच्या तयारीत तिने राष्ट्रीय स्तरावर दोन ब्रॉंझपदके मिळविली. वरिष्ठ गटातही आपली क्षमता अजमावली. दोन वेळा तिची राष्ट्रीय शिबीरासाठी देखील निवड झाली. खेलो इंडियाच्या पहिल्याच वर्षात अंतिम फेरी गाठताना चुकीचे आक्रमण केल्यामुळे सुवर्णपदक हुकल्याची खंत प्रतिक्षाला वाटते.

बॅडमिंटनमध्ये वरुण कपूर उपांत्य फेरीत
महाराष्ट्राच्या वरुण कपूरने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. त्याने दिल्लीच्या अद्वैत भार्गव याच्यावर २१-१३, २१-१३ अशी मात केली. मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या रिया हब्बूने तामिळनाडूच्या दीप्ताकुमारी हिचा २१-९, २१-११ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. २१ वर्षाखालील मुलींच्या गटातही महाराष्ट्राच्या स्मित तोष्णीवालने उपांत्य फेरीत स्थान मिळविले. तिला पश्चिम बंगालच्या पी. उथस्ला हिच्याविरुद्ध २१-१३, १५-२१, २१-११ असा विजय मिळविताना झगडावे लागले.

Web Title: Khelo India 2020: In wrestling Vijay Patil and Prithviraj won gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.