खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 05:32 PM2020-01-18T17:32:05+5:302020-01-18T17:32:33+5:30
२१ वर्षाखालील मुले व मुली अजिंक्य
गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात खो-खो मध्ये महाराष्ट्राला पर्याय नाही याचाच प्रत्यय पाहावयास मिळाला. महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही गटात अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली आणि दुहेरी मुकूट पटकाविला.
मुख्य स्टेडियमवर झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने केरळचा १६-१४ असा तीन मिनिटे राखून पराभव केला. मध्यंतराला दोन्ही संघ ९-९ अशा बरोबरीत होते. तथापि उत्तरार्धात महाराष्ट्राने पळतीमध्ये सुरेख कौशल्य दाखवित फक्त पाचच गडी गमावले. त्यामुळे त्यांच्यासाठी विजय सोपा झाला. त्यांच्या विजयात निहार दुबळे (एक मिनिट १० सेकंद, एक मिनिट ४० सेकंद व २ गडी), संकेत कदम (दीड मिनिटे, नाबाद एक मिनिट १० सेकंद व ४ गडी), दिलीप खांडवी (दोन मिनिटे व दीड मिनिट) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. केरळकडून एस.विशोग (एक मिनिट १० सेकंद व २ मिनिटे), के.सोमजित (दीड मिनिटे व एक मिनिट १० सेकंद) यांची लढत अपुरी ठरली.
मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा ९-६ एक डाव ३ गुणांनी दणदणीत पराभव केला. पूर्वार्धात महाराष्ट्राकडे ९-२ अशी मोठी आघाडी घेतली होती. महाराष्ट्राच्या विजयात प्रियांका भोपी (एक मिनिट व नाबाद ४ मिनिटे ४० सेकंद), रेश्मा राठोड (२ मिनिटे २० सेकंद व २ मिनिटे ५० सेकंद) अपेक्षा सुतार (एक मिनिट ५० सेकंद, २ मिनिटे ४० सेकंद व एक गडी), काजल भोर (३ गडी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. कर्नाटकच्या के. तेजश्री (३ मिनिटे १० सेकंद) व एल. मोनिका (४ गडी) यांचा अपवाद वगळता एकही खेळाडू चमक दाखवू शकला नाही. गतवषीर्ही महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुलींचे विजेतेपद पटकाविले होते.