खेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे रौप्य पदकावर समाधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 02:48 AM2020-01-14T02:48:43+5:302020-01-14T02:48:59+5:30

अंतिम सामन्यात हरयाणाकडून झाला ४१-२७ असा पराभव

Khelo India: Maharashtra satisfied with silver medal in kabaddi | खेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे रौप्य पदकावर समाधान 

खेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे रौप्य पदकावर समाधान 

Next

गुवाहाटी : आपल्या लौकिकानुसार खेळ करण्यात आलेल्या अपयशानंतर बलाढ्य महाराष्ट्राला खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत कबड्डीमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. २१ वर्षांखालील मुलांच्या गटात झालेल्या सामन्यात हरयाणाने प्रत्येक विभागात वर्चस्व राखताना महाराष्ट्राचे तगडे आव्हान ४१-२७ असे परतावून लावत दिमाखात सुवर्ण पदक पटकावले.

चढाईपटूंचे अपयश आणि बचावपटूंमधील चुकलेला ताळमेळ यामुळे महाराष्ट्राला मोठा पराभव पत्करावा लागला. पंकज मोहिते, अस्लम इनामदार यांनी चढाईत काहीशी छाप पाडली. दुसरीकडे हरयाणाचा कर्णधार व कोपरारक्षक सौरभ नांगल हा त्यांच्या सुवर्णपदकाचा शिल्पकार ठरला. हरयाणाने महाराष्ट्रावर तब्बल तीन वेळा लोण चढवून दबदबा राखला. १७ वर्षांखालील मुलांमध्येही महाराष्ट्राने कांस्यवर समाधान मानले.

मुलांच्या ४०० मीटर शर्यतीत मुंबईकर अरनॉल्ड मेंडीसने महाराष्ट्राला रौप्य पदक मिळवून दिले. त्याने ५३.१७ सेकंदाची वेळ देत रौप्य जिंकले. याच वयोगटात दीपक यादवने पोल व्हॉल्टमध्ये कांस्य जिंकले. २१ वर्षांखालील मुलींममध्ये निधी सिंगने ४०० मी. अडथळा शर्यतीत कांस्य जिंकताना २.४० सेकंदाची वेळ दिली. याआधी ४०० मी. शर्यतीतही तिने कांस्य जिंकले होते.

कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने याने कांस्यपदक मिळविले. सोमवारी १०० मीटर एअर रायफल प्रकारात २२७.२ गुण मिळवत त्याने तिसरा क्रमांक मिळविला. तसेच कोल्हापूरच्याच पूजा दानोळेने सलग दुसऱ्या दिवशी सायकलिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकले. सोनापूर रोडवर झालेल्या ३० किमी शर्यतीत पूजाने ३५ किमी वेगाने ५५ मिनिट ४३.३२ सेकंदाची वेळ देत सुवर्ण कामगिरी केली. 

महाराष्ट्राच्या मुलींनी १७ वर्षांखालील गटात घेतली सुवर्ण धाव
१७ वर्षांखालील मुलींच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी शानदार कामगिरी करत सुवर्ण जिंकले. प्रांजली पाटील, श्रेया शेडगे, सुदेष्णा शिवणकर व श्रृष्टी शेट्टी यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने ४८.३६ सेकंद अशी वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले.

दुसरीकडे, २१ वर्षांखालील मुलींमध्ये ॠशिका नेपाळी, सिध्दी हिरे, निधी सिंग व कीर्ती भोईटे यांंनी महाराष्ट्राला ४ बाय १०० मीटरमध्ये कांस्य पदक मिळवून दिले. हरयाणाने १२ सुवर्ण पदके जिंकत पदकतालिकेमध्ये महाराष्ट्राला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली.

Web Title: Khelo India: Maharashtra satisfied with silver medal in kabaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी