खेलो इंडिया : सायकलिंगमध्ये महाराष्ट्राचा सुवर्ण श्रीगणेशा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 08:22 PM2020-01-12T20:22:02+5:302020-01-12T20:24:59+5:30
कोल्हापूरच्या पूजा दानोळे, मुंबईच्या मधुरा वायकर हिला सुवर्ण
गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या यंदाच्या तिस-या पर्वापासून समाविष्ट करण्यात आलेल्या सायकलिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी सुवर्णपदकाने सुरवात केली. कोल्हापूरच्या पूजा दानोळे हिने १७, तर मुंबईच्या मधुरा वायकर हिने २१ वर्षांखालील गटात अनुक्रमे १५ आणि २० कि.मी. रोड रेस शर्यतीत सुवर्णपदक मिळविले.
गुवाहटीपासून जवळपास ४० कि.मी. दूर असलेल्या सोनापूर हम रस्त्यावर ही शर्यत पार पडली. महाराष्ट्राचे सायकलपटू छाप पाडणार असा विश्वास सुरवातीलाच प्रशिक्षक दीपाली पाटील यांनी व्यक्त केला होता. तो त्यांच्या खेळाडूंनी सार्थ ठरवला. मुलांमध्ये अपयश आले असले, तरी मुलींनी त्याची भरपाई केली. सर्व प्रथम मधुराने २० कि.मी. अंतराची शर्यत ३० मिनीट ३६ सेकंद अशी वेळ देत जिंकली. या वेळी तीचा सायकलिंगचा वेग तब्बल ताशी ३९ प्रति कि. मी. इतका होता. तिने कर्नाटकाच्या मेघा गुगड (३१ मि. ०५ सेकंद), सौम्या अंतापूर (३१ मि.३३ सेकंद) यांना मागे टाकले.
मुलींच्या १७ वर्षांखालील अशी सोनेरी कामगिरी इचलकरंजीच्या पूजा दानोळे हिने केली. तिने १० कि.मी. अंतर ताशी ३७ कि.मी. वेगाने २४ मिनीट १८ सेकंद वेळात पार केले. तिने दिल्लीच्या लिआक्रेस एंजनो (दिल्ली), रीत कपूर (चंडिगड) या दोघींना मागे टाकले. एंजनो २४ मि.५९ सेकंद वेळेसह रौप्य, तर रीत २५.१८ सेकंद वेळेसह ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली.