दहावीच्या अभ्यासाची पुस्तकेही सोबत आणलीत की!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 10:40 PM2019-01-13T22:40:50+5:302019-01-14T01:34:21+5:30
खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील खो-खो संघात ६ खेळाडू दहावीतील
- अमोल मचाले
पुणे - 'खेलो इंडिया यूथ गेम्स'च्या निमित्ताने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळाडूंच्या रूपातील १७ तसेच २१ वर्षांखालील मुला-मुलींचा जणू कुंभमेळाच भरला आहे. स्पर्धेत अव्वल कामगिरी करण्याचा निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवतो. स्पर्धेत सहभागी खेळाडूंपैकी या अनेक खेळाडू दहावी तसेच बारावीत शिकणारे आहेत. १७ वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र संघात दहावीत शिकणाऱ्या एक-दोन नव्हे तर, तब्बल ६ खेळाडू आहेत. दहावीचा अभ्यास महत्वाचा असल्याने स्पर्धेच्या काळात अभ्यास बुडणार नाही का, असा प्रश्न विचारल्यावर "अभ्यासाची पुस्तकेही सोबत आणलीत की! रात्री आम्ही एक तास अभ्यासही करतो," असे दमदार उत्तर देताना पुण्यातील नियती बंगाले या खेळाडूचा चेहरा स्पर्धेसोबतच दहावीच्या परीक्षेतही यश मिळवण्याचा निर्धाराने सायंप्रकाशात अधिकच उजळून निघाला होता.
१५ वर्षीय नियती ही रेणुका स्वरूप शाळेत दहावीत शिकत आहे. तिचे वडील साईट इंजिनिअर असून आई घरकाम करते. चौथीपर्यंत लंगडी खेळणाऱ्या नियतीच्या खेळातील वेग बघून प्रशिक्षक प्रशांत ओक यांनी तिला खो-खो खेळण्याचा सल्ला दिला. आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभत असल्याने दहावीला शिकत असूनही मी या स्पर्धेत सहभागी झाल्याचे तिने आवर्जून सांगितले. नियती ही राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा खेळली आहे. मागील वर्षी सुवर्ण जिंकणाऱ्या महाराष्ट्र संघातही तिचा समावेश होता.
सुवर्णपदकच जिंकायचे आहे
या सर्व मुलींच्या निरागस चेहऱ्यांवर सुवर्णपदक जिंकण्याचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत होता. या गटात महाराष्ट्र संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. "गुजरातचा संघही ताकदीचा आहे. मात्र आम्हाला महाराष्ट्राला सुवर्णपदकच जिंकून द्यायचे आहे," असा निर्धार नियतीसह सर्व मुलींनी व्यक्त केला.
परीक्षेतही यश मिळवू...
पुण्यात पर्वती येथे राहणाऱ्या नियतीसह पुणे जिल्ह्यातील इंदापूरची साक्षी करे, उस्मानाबादच्या गौरी शिंदे आणि किरण शिंदे, ठाण्याची दिशा सोनसुरकर तसेच सांगलीची रितिका मगदूम या महाराष्ट्र संघातील खेळाडू येत्या १ मार्चपासून दहावीची परीक्षा देणार आहेत. खेळासोबतच आम्हाला शिक्षणही महत्वाचे वाटते ही त्यांची सामुहिक प्रतिक्रिया होती. "स्पर्धेसाठी आम्ही इथे आलो असताना सोबत अभ्यासाची पुस्तकेही आणली आहेत. सराव शिबिर सुरू होते तेव्हा आम्ही २ तास अभ्यास करायचो. आता स्पर्धेदरम्यान निवासाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी रात्री किमान एक तास आम्ही अभ्यास करतो. गरज भासते तेव्हा सहाजणी सामूहिक अभ्यास करतो. कधी कधी गटाने तर कधी एकत्र अभ्यास करून आमची परिक्षेची तयारी सुरू आहे," असे नियतीने 'लोकमत'ला सांगितले. या स्पर्धेबरोबरच दहावीच्या परीक्षेत ही आम्ही अपेक्षित यश मिळवू, असा विश्वास या ६ खेळाडूंनी व्यक्त केला.