‘खेलो इंडिया’ योग्य दिशेने उचलण्यात आलेले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 02:11 AM2020-02-29T02:11:44+5:302020-02-29T02:11:55+5:30
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या माध्यमातून मिळालेल्या व्यासपीठामुळे युवा खेळाडूंना मोठी झेप घेण्याची संधी मिळेल.
- पी. टी. उषा
ओडिशा येथे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेची शानदार सुरुवात पाहून मी फार उत्साहित झाले. हे योग्य दिशेने उचलण्यात आलेले पाऊल आहे. खेलो इंडिया शालेय स्पर्धेच्या पहिल्या सत्रात तसेच खेलो इंडिया यूथ गेम्सच्या दुसऱ्या सत्रानंतर पायाभूत स्तरावर प्रतिभा शोधण्यात मदत मिळाली. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या माध्यमातून मिळालेल्या व्यासपीठामुळे युवा खेळाडूंना मोठी झेप घेण्याची संधी मिळेल.
अॅथलेटिक्ससारख्याखेळामध्ये युवांना सिनियर स्तरावर स्वत:ला सिद्ध करणे सोपे नसते. त्यांना काही वेळ व संधी मिळणे आवश्यक असते. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेच्या माध्यमातून ही संधी मिळेल.
स्टार द्युतीचंद ही याचे उत्तम उदाहरण आहे. यामुळे हे सिद्ध होते की विद्यापीठ स्पर्धा आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्यात उपयुक्त ठरतात. गतवर्षी द्युतीने विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकून भारताचा गौरव वाढवला. याद्वारे तिला विश्वस्तरावर पदक जिंकण्यासाठी कठोर मेहनतीची प्रेरणा मिळेल. द्युतीचंद खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत सहभागी झाली असून ती या स्पर्धेत महिलांच्या १०० मीटर शर्यतीत आकर्षण असेल.
एमजी विद्यापीठाची आंतर विद्यापीठ सुवर्ण विजेती एन. एस. सिमीची कामगिरी पाहण्यास मी उत्सुक आहे. सिमीने १०० मीटरमध्ये ११.५६ सेकंदांची वेळ नोंदवली आहे. सिमीसारख्या धावपटूंमुळे भारताच्या ४ बाय १०० मीटर महिला रिले संघाला मोठा फायदा होईल. आणखी एक गुणवान धावपटू आरती पाटील हिच्याकडेही माझे लक्ष आहे. तिने पुण्यात आंतर विद्यापीठ लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. आरतीही कविता राऊत व ललिता बाबर यांच्या पावलांवर पाऊल टाकून नावलौकिक कमवू शकेल.