हॉटेल कामगाराच्या मुलीची ‘वजन’दार कामगिरी! लातूरच्या समीक्षा मंदेची ‘सुवर्ण’लिफ्ट
By राजकुमार जोंधळे | Published: June 19, 2024 07:49 PM2024-06-19T19:49:43+5:302024-06-19T19:50:36+5:30
पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेतील यशाचा आनंद...
महेश पाळणे / लातूर : घरची परिस्थिती हलाखीची... त्यात लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले... हाॅटेलमध्ये महिला कामगार म्हणून काम करणाऱ्या आईने समीक्षाला पाठबळ दिले. याच पाठबळावर लातूरची समीक्षा अमाेल मंदे हिने खेलाे इंडिया महिलांच्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत वजनदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकाविले आहे.
मध्य प्रदेशातील इंदाैर येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलाे इंडिया महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत लातुरातील गाेदावरी लाहाेटी कन्या प्रशालेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या समीक्षा मंदे हिने यूथ गटात (१९ वर्षांखालील) महाराष्ट्राकडून खेळताना राज्याला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. कठीण परिस्थितीला ताेंड देत समीक्षाने हे यश मिळविले आहे. पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत समीक्षाने यश मिळविल्याने तिच्या या ‘वजन’दार कामगिरीचा सर्वत्र बाेलबाला हाेत आहे. या स्पर्धेत देशभरातील अनेक महिला खेळाडूंनी सहभाग नाेंदविला हाेता. त्यामध्ये समीक्षाने एकूण १३८ किलाे वजन उचलत सुवर्ण किमया केली. त्यात क्लिन ॲण्ड जर्क ८० किलाे व स्नॅच ५८ किलाे असा समावेश हाेता. सरावातील सातत्याने तिला हे यश प्राप्त करता आले असून, प्रशिक्षक नीलेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षकांनी उचलला ‘डायट’वरील खर्च...
घरची परिस्थिती बिकट असल्याने समीक्षाला आर्थिक चणचण हाेती. मात्र, तिचे खेळातील काैशल्य पाहून प्रशिक्षक नीलेश जाधव यांनी तिच्या डायटचा खर्च उचलला. या मदतीचे रूपांतर समीक्षाने सुवर्णपदकात केले आहे. नियमित पाच तास ती कसून सराव करत हाेती. यासह तिच्या ताकदीचा उपयाेग या कामगिरीत झाला आहे. उन्हाळ्याच्या सुटीतही तिने दुपारच्या वेळेत सरावाला प्राधान्य दिले.
राज्य स्पर्धेतही मिळविले राैप्य...
छत्रपती संभाजीनगर येथे गतवर्षी झालेल्या राज्यस्तरीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने राैप्यपदक पटकाविले हाेते. यासह पुणे येथे झालेल्या राज्य पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेतही तिने राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला हाेता. शालेय स्पर्धेतही तिने राज्यस्तरावर धडक मारली आहे. पहिल्यांदाच खेळलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत समीक्षाने सुवर्ण कामगिरी केली आहे.
पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेतील यशाचा आनंद...
राष्ट्रीय स्पर्धेतील माझा हा पहिलाच अनुभव हाेता. यामध्ये सुवर्णपदक मिळाल्याचा आनंद आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीचे हे फळ असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा मानसही आहे. या स्पर्धेतही भारतासाठी पदक मिळविण्याचे स्वप्न आहे. - समीक्षा मंदे, लातूर