खो खो स्पर्धा : विहंग आणि सरस्वती संघांमध्ये अंतिम फेरी रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:05 PM2020-01-27T22:05:20+5:302020-01-27T22:05:47+5:30
सरस्वती स्पोर्ट्स क्लबने फादर अँग्नल जिमखान्याचा ४-३ (०२-०१ व ०२-०२) असा १ गुणाने पराभव केला.
मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई खो-खो संघटनेच्या सहकार्याने विद्यार्थी क्रीडा केंद्राने ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २६ जानेवारी या कालावधीत लालमैदान, आई माई मेरवानजी स्ट्रीट, परळ येथे ४ फुट ११ इंच (कुमार गट) व व्यावसायिक निमंत्रित विभागीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
व्यावसायिक गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नवी मुंबई महानगरपालिकेने महावितरण कंपनीवर १२-१० (१०-०४ व ०२-०६) असा असा दोन गुणांनी पराभव केला. या सामन्यात नवी मुंबई पालिकेच्या प्रदीप जाधवने दोन मिनिटे दहा सेकंद व एक मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण करत दोन गडी बाद केले. महेश शिंदेने एक मिनिटे तीस सेकंद व नाबाद एक मिनिटे दहा सेकंद संरक्षण केले व आक्रमणात एक गडी बाद केला. गजानन शेंगाळने आक्रमणात चार गडी टिपले. पराभूत महावितरणतर्फे सिद्वीक भागतने दोन मिनिट संरक्षण करत दोन खेळाडू बाद केले तर प्रतीक वाईकरने एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण केले व एक गडी बाद केला. तसेच विराज कोठमकरने एक मिनिट वीस सेकंद संरक्षण केले व एक गडी बाद करत चांगला खेळ केला.
दुसऱ्या व्यावसायिक उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात श्री साई इलेट्रीकल्सने पश्चिम रेल्वेवर १६-१५ (०९-०८-०७-०७) असा एका गुणाने पराभव केला. या सामन्यात श्री साई इलेट्रीकल्सतर्फे खेळताना पियुष घोलमने दोन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण करत पाच गडी बाद केले. शुभम शिगवणने एक मिनिटे तीस सेकंद, एक मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण करत एक गडी बाद केला तर विश्वजित कांबळेने प्रत्येकी एक मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केले. तर वेदांत देसाई याने आक्रमणात तीन गडी टिपले. पराभूत पश्चिम रेल्वेच्या अमोल जाधवने एक मिनिट चाळीस सेकंद व दोन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण करत दोन गडी बाद केले. राहुल उईकेने एक मिनिटे संरक्षण करत आक्रमणात सात गडी बाद केले तर रंजन शेट्टीने एक मिनिटे संरक्षण करत आक्रमणात चार गडी बाद करत चांगला प्रतिकार केला.
कुमारांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने फादर अँग्नल जिमखान्याचा ४-३ (०२-०१ व ०२-०२) असा १ गुणाने पराभव केला. या सामन्यात सरस्वतीच्या सुरज सोलकरने नाबाद ७:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात १ गडी बाद करत अष्टपैलू खेळ केला, सुरज वैश्यने ४:१० मिनिटे संरक्षण केले. तर भूषण खांबेने २:२० मिनिटे संरक्षण केले. पराभूत फादर अँग्नलच्या ऋषिकेश चोरगेने १:१०, ४:२० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात १ खेळाडूला बाद केले. तर राजवधान दळवीने ४:४०, नाबाद १:१० मिनिटे संरक्षण करत चांगला प्रतिकार केला.
कुमारांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विहंग क्रीडा मंडळने, शिर्सेकर महात्मा गांधीचा ०८-०४ (०५-०२ व ०३-०२) असा ४ गुणांनी पराभव केला. या सामन्यात विहंगतर्फे खेळताना आशिष गौतमने २:००, ३:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात ३ खेळाडूला बाद करून अष्टपैलू खेळ केला. गणेश यादवने २:२०, २:५० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात १ खेळाडू बाद केला. मयुरेश मोरेने नाबाद २:३०, नाबाद १:१० मिनिटे संरक्षण केले. पराभूत महात्मा गांधीतर्फे खेळताना सुजय गायकवाडने २:००, २:३० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात १ खेळाडू बाद केला. तर मंधन लोहारने २:२०, १:४० मिनिटे संरक्षण करत चांगला प्रतिकार केला.