किदाम्बी श्रीकांतचा ‘सुपर’ दबदबा

By Admin | Published: June 26, 2017 01:32 AM2017-06-26T01:32:49+5:302017-06-26T01:32:49+5:30

स्टार शटलर किदाम्बी श्रीकांत याने ऐतिहासिक विजयाची नोंद करताना रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात आॅलिम्पिक

Kidambi Srikkanth's 'super' clout | किदाम्बी श्रीकांतचा ‘सुपर’ दबदबा

किदाम्बी श्रीकांतचा ‘सुपर’ दबदबा

googlenewsNext

सिडनी : स्टार शटलर किदाम्बी श्रीकांत याने ऐतिहासिक विजयाची नोंद करताना रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात आॅलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन चीनच्या चेन लाँगचा पराभव करून आॅस्टे्रलिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे गेल्या दोन आठवड्यांत श्रीकांतने पटकावलेले हे दुसरे सुपर सीरिज विजेतेपद ठरले. त्याचबरोबर या शानदार विजयासह सर्वाधिक सुपर सीरिज पटकावणारा भारतीय खेळाडूचा मानही मिळविला.
जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या श्रीकांतने आपला तुफान फॉर्म कायम राखताना जागतिक क्रमवारीमध्ये सहाव्या स्थानी असलेल्या लाँगला सरळ दोन गेममध्ये नमविले. ४५ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात श्रीकांतने दमदार खेळाचे प्रदर्शन करताना २२-२०, २०-१६ अशी बाजी मारत जेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे याआधी श्रीकांत लाँगविरुद्ध पाचवेळा लढला होता आणि प्रत्येकवेळी श्रीकांतला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. परंतु, यावेळी श्रीकांतच्या तुफान फॉर्मपुढे लाँगचा काहीच निभाव लागला नाही.
त्याचबरोबर, श्रीकांतने सलग दुसरे सुपरे सीरिज विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली. गेल्याच आठवड्यात श्रीकांतने इंडोनेशिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावले होते. तसेच, याआधी त्याला सिंगापूर ओपन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्यावर्षी या स्पर्धेत श्रीकांतने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
अंतिम सामना चांगलाच रंगला. लाँगने अपेक्षेप्रमाणे आक्रमक खेळ करताना श्रीकांतवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. त्याने उत्कृष्ट बेसलाइन स्ट्रोक्स मारताना उच्च दर्जाचा खेळ केला. मात्र, श्रीकांतने जोरदार प्रत्युत्तर देताना सामन्यात रंग भरले. त्याने शानदार पुनरागमन करताना जबरदस्त स्मॅशचा हल्ला करताना लाँगवर वर्चस्व मिळविले.
पहिल्या गेममध्ये श्रीकांतला खूप झुंजावे लागले. १७-१५ अशी आघाडी घेतल्यानंतर श्रीकांतला लाँगने गाठले. लाँग एक गेम पॉइंट वाचविण्यात यशस्वी ठरल्यानंतर श्रीकांतने पुढच्यावेळी कोणतीही चूक न करताना गेम पॉइंट मिळवत २२-२० असा गेम जिंकून सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये लाँगकडून पुनरागमनाची अपेक्षा होती.
पहिले गुण जिंकून आघाडी घेतलेल्या श्रीकांतने अखेरपर्यंत आघाडी टिकवून ठेवत दुसरा गेम २०-१६ असा जिंकत विजेतेपदावर नाव कोरले. (वृत्तसंस्था)
जगातील केवळ पाचवा खेळाडू..
सलग तीन सुपर सीरिज अंतिम सामना खेळणारा श्रीकांत जगातील केवळ सहावा शटलर ठरला. यावर्षी एप्रिलमध्ये सिंगापूर ओपनमध्ये उपविजेता ठरल्यानंतर श्रीकांतने इंडोनेशिया व आॅस्टे्रलिया ओपनचे जेतेपद पटकाविले. याआधी सलग तीन सुपर सीरिज अंतिम सामना खेळण्याचा पराक्रम लीन डॅन (चीन), ली चाँग वी (मलेशिया), चेन लाँग (चीन), बाओ चुनलाई आणि सोनी ड्वी कुनकारो यांनी केला आहे.
सुपर सीरिज जिंकणारा पहिला भारतीय...
चार सुपर सीरिज जिंकलेला श्रीकांत पहिला पुरुष भारतीय शटलर ठरला. त्याने २०१४ मध्ये चायना ओपन आणि २०१५ मध्ये इंडिया ओपन स्पर्धा जिंकली. यानंतर, आता जून २०१७ मध्ये लागोपाठ इंडोनेशिया आणि आॅस्टे्रलिया ओपन स्पर्धेवर कब्जा केला.
पहिला भारतीय पुरुष खेळाडू...
आॅस्टे्रलिया ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद पटकाविणारा श्रीकांत पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. याआधी महिलांमध्ये सायना नेहवालने दोनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
५ लाख आणि कार...
श्रीकांतच्या शानदार कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकांसह बक्षिसांचाही वर्षाव झाला. भारतीय बॅडमिंटन संघटनेने श्रीकांतला ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. तसेच, दुसरीकडे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी श्रीकांतला महिंद्रा ईटीयूव्ही ३०० कार बक्षीस देण्याचे जाहीर केले. आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, ‘श्रीकांतच्या झुंजार वृत्तीने आपल्याला गौरवान्वित केले’.
यावर एका चाहत्याने महिंद्रा यांना रिट्विट करीत श्रीकांतला फक्त पाच लाख मिळाले. क्रिकेटपटूंच्या तुलनेत ही रक्कम कमी वाटते. कृपया तुम्ही काहीतरी करा, अशी विनंती केली. यावर महिंद्रा यांनी मी स्वत: श्रीकांतला महिंद्रा टीयूव्ही ३०० कार प्रदान करेन, अशी ग्वाही दिली.

Web Title: Kidambi Srikkanth's 'super' clout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.