जपानकडून किर्गिझस्तानचा धुव्वा
By admin | Published: September 20, 2016 05:28 AM2016-09-20T05:28:19+5:302016-09-20T05:28:19+5:30
बांबोळी येथील मैदानावर झालेल्या सामन्यात जपानच्या अकितो तानाहाशीने हॅट्ट्रिक नोंदवली.
पणजी/मडगाव : बांबोळी येथील मैदानावर झालेल्या सामन्यात जपानच्या अकितो तानाहाशीने हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर जपानने किर्गिझस्तानचा ८-० ने धुव्वा उडवला. या शानदार प्रदर्शनानंतर जपानने १६ वर्षांखालील एएफसी चषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. ‘ब’ गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठणारा जपान हा पहिला संघ ठरला.
या सामन्यात दोन वेळा विजेत्या जपानच्या तानाहाशीने गोल नोंदवून संघाचे खाते उघडले. त्यांनी सुरुवातीपासून सामना आपल्याकडे खेचला होता. प्रतिस्पर्ध्यांना कोणतीही संधी दिली नाही. ताकेफुसा कुबो आणि केइतो नाकामुरा यांनी गोल नोंदवून पहिल्या हाफमध्ये संघाला ३-० अशा आघाडीवर नेले होते. दुसऱ्सा हाफमध्ये नाकामुरा, तानाहाशी आणि तोइची सुझुकी यांनी पाच मिनिटांच्या अंतराने धडाधड तीन गोल नोंदवले. तानाहाशी याने शेवटच्या दहा मिनिटांत हॅट्ट्रिक नोंदवली. इन्जुरी वेळेतही त्याने स्वत:चा चौथा गोल नोंदवला.
मलेशिया-इराक सामना ‘ड्रॉ’
फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अंतिम क्षणाला अलीफ याने नोंदवलेल्या गोलमुळे मलेशियाने इराकविरुद्ध बरोबरी साधण्यात यश मिळविले. १६ वर्षांखालील एएफसी फुटबॉल चषक स्पर्धेतील ‘क’ गटातील हा सामना १-१ अशा बरोबरीवर संपुष्टात आला.इराक संघाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले. त्यांनी बऱ्याच संधी निर्माण केल्या. ४३व्या मिनिटाला मोहंमद रिधा जलील मेजहर याने इराकला आघाडी मिळवून दिली. दुसरीकडे, मलेशियाने अधिक वेळ गोलजाळ्यावर बचाव करण्यात गमावला. दुसऱ्या सत्रातील ५८व्या मिनिटाला मुथंदरची पेनल्टी इराकच्या गोलरक्षकाने अडविली व त्यांची संधी हुकली. अखेर ८४व्या मिनिटाला यश मिळाले. अलीफने शानदार गोल नोंदवून संघाला बरोबरी साधून दिली. या सामन्यानंतर इराकचे २, तर मलेशियाचा आजच्या बरोबरीनंतर २ सामन्यांतून एक गुण झाला आहे.