किंग्स पंजाबचे केकेआरला आव्हान
By admin | Published: April 13, 2017 04:12 AM2017-04-13T04:12:44+5:302017-04-13T04:12:44+5:30
दोन वेळेचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल-१० मध्ये विजयी सातत्य राखणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबचे आज गुरुवारी कडवे आव्हान असेल.
कोलकाता : दोन वेळेचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल-१० मध्ये विजयी सातत्य राखणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबचे आज गुरुवारी कडवे आव्हान असेल. गौतम गंभीरच्या नेतृत्वात २०१२ आणि २०१४ असे दोनदा जेतेपद मिळविणाऱ्या केकेआरचा पंजाबविरुद्ध जय-पराजयाचा रेकॉर्ड १३-६ असा आहे. ख्रिस लीन जखमी झाल्याने परिस्थितीत बदल झालेला जाणवत आहे.
आॅस्ट्रेलियाचा फलंदाज लीन याने सलामीच्या लढतीत गुजरातविरुद्ध नाबाद ९३ धावा केल्या; शिवाय गौतम गंभीरसोबत १९३ धावांची भागीदारी करताच केकेआरने १० गड्यांनी सामना जिंकला होता. मुंबई इंडियन्सविरुद्ध लीनला डाव्या खांद्याला दुखापत झाली. केकेआरला हा सामना ४ गड्यांनी गमवावा लागला. त्याआधी २०१४मध्ये लीनने याच दुखण्यावर श्स्त्रक्रिया करून घेतली होती. त्याचे उद्या खेळणे निश्चित नाही. वेगवान गोलंदाज उमेश यादव संघात परतला, ही केकेआरसाठी दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल. पहिल्या दोन्ही सामन्यांत उमेश खेळला नाही. यंदा १३ पैकी १२ कसोटी सामने खेळणाऱ्या उमेशने बऱ्यापैकी गडी बाद केले आहेत. मुंबईविरुद्ध महागडा ठरलेल्या अंकित राजपूतचे उमेश स्थान घेईल. याशिवाय बांगलादेशाचा शाकीब अल् हसन हा ट्रेंट बोल्ट किंवा ख्रिस व्होग्स यांच्यापैकी एकाची जागा घेऊ शकतो. रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडे यांच्याकडून गंभीरला धावांची अपेक्षा आहे.
२०१४च्या पर्वात अंतिम फेरी गाठणाऱ्या पंजाबने यंदा वीरेंद्र सेहवागच्या मार्गदर्शनात वाटचाल सुरू केली. पुणे आणि बँगलोर संघांवर विजय मिळविताना संघव्यवस्थापनाने अनेक साहसी निर्णय घेतले. इयोग मोर्गन आणि डेरेन सॅमी यांना मागे ठेवून ग्लेन मॅक्सवेलकडे नेतृत्व सोपविण्याचा सर्वांत मोठा निर्णय होता. मॅक्सवेलने पहिल्या सामन्यात नाबाद ४४ आणि पुढच्या सामन्यात २२ चेंडूंत नाबाद ४३ धावा ठोकल्या. याशिवाय सेहवागने आधी केकेआरकडे असलेल्या ईशांत शर्माला अखेरच्या क्षणी संघात आणले.