किंग्ज इलेव्हन पंजाबचा गुजरात लायन्सवर 23 धावांनी दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2016 07:56 PM2016-05-01T19:56:01+5:302016-05-01T21:55:10+5:30
इंडियन प्रीमिअर लीगच्या म्हणजेच आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात लायन्स संघाला किंग्ज इलेव्हन पंजाबनं पराभवाची धूळ चारली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 1- इंडियन प्रीमिअर लीगच्या म्हणजेच आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात लायन्स संघाला किंग्ज इलेव्हन पंजाबनं पराभवाची धूळ चारली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं दिलेल्या 155 धावांचा पाठलाग करताना गुजरात लायन्सला घाम फुटला आहे. गुजरात लायन्सनं 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 131 धावा कुटल्यात. किंग्ज इलेव्हन पंजाबनं विजयरथावर असलेल्या गुजरात लायन्सला विजयापासून रोखले आहे.
स्मिथनं 18 चेंडूंत 1 चौकार आणि 1 षटकारासह 15 रन्स काढून धडाकेबाज सुरुवात करूनही गुजरात लायन्सच्या पदरी अपयश आलं आहे. कॅप्टन रैनानंही 15 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकार खेचत 18 धावा केल्या आहेत. मात्र विजयापासून रैनाच्या संघाला दूर राहावे लागले आहे. यावेळी किशननं 24 चेंडूंत 3 चौकार मारत 27 धावा खेचल्यात. तर फॉकनरनं 27 चेंडूंत 3 चौकार झोडत 32 धावा केल्यात. कुमारनंही 13 चेंडूंत 2 चौकार लगावत 15 धावा केल्या आहेत. मॅक्युलम 1, कार्तिक 2, जडेजा 11, कुलकर्णी नाबाद 6. तर ब्राव्हो भोपळाही न फोडता परतला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं गुजरात लायन्ससमोर 155 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
राजकोटवरच्या या सामन्यात सर्वच्या सर्व गडी गमावून किंग्ज इलेव्हन पंजाबनं 19.5 षटकांत 154 धावा केल्या आहेत. एम. विजयनं 41 चेंडूंमध्ये 6 चौकार लगावत 55 धावा काढून विजयी घोडदौडीला सुरुवात करूनही पदरी अपयश आलं आहे. एम.पी. स्टॉनिसनंही शानदार खेळी खेळत 17 चेंडूंमध्ये 1 षटकार आणि 3 चौकार ओढत 27 धावा केल्या आहेत. मिलरनं 27 चेंडूंमध्ये 2 चौकार ओढत 31 धावा कुटल्यात. तर साहानं 19 चेंडूंमध्ये 4 चौकार लगावत 33 धावा काढल्या आहेत. शर्मा 1, करिप्पा 1, संदीप शर्मा नाबाद 1 धावा काढल्या. मॅक्सवेल आणि पटेल भोपळाही न फोडता माघारी परतले. तर मार्शनं 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धावा काढून बाद झाला. गुरुकीरत सिंगही धावबाद झाला. या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबनं विजय मिळवून आपले स्थान अधोरेखित केलं आहे. तर गुजरात लायन्सवर पराभव पत्करण्याची नामुष्की ओढावली आहे.