लायन्सला धक्का देण्यास किंग्ज इलेव्हन पंजाब सज्ज
By admin | Published: May 7, 2017 12:38 AM2017-05-07T00:38:52+5:302017-05-07T00:38:52+5:30
सलग दोन विजयांमुळे आत्मविश्वास बळावलेला किंग्ज इलेव्हन पंजाब आयपीएल-१० मध्ये रविवारी प्लेआॅफची वाटचाल
मोहाली : सलग दोन विजयांमुळे आत्मविश्वास बळावलेला किंग्ज इलेव्हन पंजाब आयपीएल-१० मध्ये रविवारी प्लेआॅफची वाटचाल सोपी करण्यासाठी गुजरात लायन्सला धक्का देण्यास सज्ज आहे.
दिल्लीचा दहा गड्यांनी पराभव करणाऱ्या पंजाबने काल आरसीबीवरदेखील विजय साजरा केला. पंजाबचे दहा सामन्यांत पाच विजयांसह दहा गुण असून गुजरात लायन्सचे ११ सामन्यांत तीन विजयांसह केवळ सहा गुण आहेत. पंजाबकडून हाशिम आमलाने सर्वाधिक ३१६ धावा केल्या असून त्यात मुंबईविरुद्ध ठोकलेल्या शतकाचा समावेश आहे. मार्टिन गुप्टिल, शॉन मार्श, मनन व्होरा, वृद्धिमान साहा आणि अक्षर पटेल या सर्वांनी संघासाठी योगदान दिले आहे. कर्णधार ग्लेन मॅक्सवेल याचा फॉर्म मात्र संघाच्या चिंतेचा विषय आहे.
गोलंदाजीत संदीप शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रभावित केले, पण वरुण अॅरॉन आणि मोहित शर्मा हे मात्र अपयशी ठरले आहेत.
दुसरीकडे गुजरात संघ प्लेआॅफमधून बाहेर पडला असून मागच्या दोन्ही सामन्यांत त्यांचा पराभव झाला. दिल्लीविरुद्ध मागच्या सामन्यात ७ बाद २०८ धावा नोंदविल्यानंतरही त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. ब्रँडन मॅक्युलमच्या पायाचे स्नायू ताणले गेल्याने संघाला धक्का लागला आहे. संघाकडून कर्णधार सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांनीच धावांचे बऱ्यापैकी योगदान दिले. इशान किशन, अॅरॉन फिंच आणि ड्वेन स्मिथ यांच्यासारखे फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरले आहेत. संघाला गोलंदाजीत अनुभवहीनतेचादेखील फटका बसला आहे. (वृत्तसंस्था)