किंग्ज इलेव्हनची सरशी
By admin | Published: April 24, 2017 01:04 AM2017-04-24T01:04:39+5:302017-04-24T06:15:10+5:30
हाशिम आमलाच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने इंडियन प्रीमिअर लीगच्या
राजकोट : हाशिम आमलाच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वात रविवारी गुजरात लायन्सचा २६ धावांनी पराभव केला आणि सलग चार पराभवांची मालिका खंडित केली.
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८८ धावांची मजल मारली आणि के. सी. करिअप्पा (२-२४), संदीप शर्मा (२-४०) व अक्षर पटेल (२-३६) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर प्रतिस्पर्धी गुजरात संघाचा डाव ७ बाद १६२ धावांत रोखला. गुजरात संघातर्फे दिनेश कार्तिकचे (नाबाद ५८ धावा, ४४ चेंडू, ६ चौकार) प्रयत्न अखेर अपुरेच पडले. पंजाबने सात सामन्यांत तिसरा विजय नोंदवला, तर लायन्स संघाला सात सामन्यांत पाचव्यांदा पराभव स्वीकारावा लागला. लायन्स संघाची गुणातालिकेत तळाच्या स्थानावर घसरण झाली.
त्याआधी, हाशिम आमलाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हनने ७ बाद १८८ धावांची दमदार मजल मारली. आमलाने ४० चेंडूंना सामोरे जाताना दोन षटकारांच्या मदतीने ६५ धावा फटकावल्या. आमलाने शॉन मार्शसोबत (३०) दुसऱ्या विकेटसाठी ७० आणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेलसोबत (३१) तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने शेवटी १७ चेंडूंमध्ये ३४ धावांची खेळी करीत संघाला आव्हानात्मक मजल मारून दिली. गुजराततर्फे वेगवान गोलंदाज अँड्य्रू टायने दोन, तर शुभम अग्रवाल, नाथू सिंग, रवींद्र जडेजा व ड्वेन स्मिथ यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. किंग्ज इलेव्हन पंजाबने दुसऱ्या षटकात मनन व्होराला (०२) गमावले. नाथू सिंगच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने त्याचा झेल टिपला.