कीर्ती भोइटेने मोडला २७ वर्षे जुना विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 10:35 PM2019-11-11T22:35:25+5:302019-11-11T22:35:50+5:30
आंतर महाविद्यालयीन अॅथलेटिक्स; २०० मीटर शर्यतीत मिळवले सुवर्ण पदक
मुंबई : कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कीर्ती भोइटे हिने महाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना सुवर्ण पदकावर कब्जा केला. त्याचवेळी रश्मी शेरेगर आणि सरोज शेट्टी यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. कीर्तीने यावेळी सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या झेनिया एर्टन हिने १९९२-९३ साली नोंदवलेला विक्रम मोडला.
मुंबई विद्यापीठाच्या मान्यतेने मरीन लाइन्स येथील क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत कीर्तीने विक्रमी कामगिरी करताना मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालीय स्पर्धेतील तब्बल २७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या कीर्तीने २४.३ सेकंदाची वेळ देत सहजपणे सुवर्ण पदकावर नाव कोरले. झेनियाने २४.८ अशी वेळ नोंदवत २७ वर्षांपूर्वी विक्रमी कामगिरी केली होती. ती कामगिरी मागे टाकत कीर्तीने सुवर्ण धाव घेतली. त्याचवेळी ठाकूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रश्मीने २५.२ सेकंदासह रौप्य पदकावर कब्जा केला. रिझवी महाविद्यालयाच्या सरोजला २६.४ सेकंदासह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.