किवी प्रशिक्षकांची खेळाडूंवर टीका
By admin | Published: November 1, 2016 02:08 AM2016-11-01T02:08:59+5:302016-11-01T02:08:59+5:30
भारत दौऱ्यातील अखेरच्या वन-डे सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंड संघातील खेळाडूंवर किवी प्रशिक्षक माईक हेसन यांनी टीका केली.
वेल्गिंटन : भारत दौऱ्यातील अखेरच्या वन-डे सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंड संघातील खेळाडूंवर किवी प्रशिक्षक माईक हेसन यांनी टीका केली. भारत दौऱ्यात न्यूझीलंड संघाला कसोटी मालिकेत ०-३ ने तर वन-डे मालिकेत २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. पाहुणा संघ पाचव्या व निर्णायक वन-डे लढतीत ७९ धावांत गारद झाला. त्यांना या लढतीत १९० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रशिक्षक हेसन यांनी आता आपले लक्ष स्थानिक मोसमावर केंद्रित केले आहे. न्यूझीलंड संघाला मायदेशात पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्ध मालिका खेळायच्या आहेत. हेसन न्यूझीलंड रेडिओवर बोलताना म्हणाले,‘गेल्या तीनपैकी दोन सामन्यांत आम्ही विजय मिळवला होता. त्यामुळे आमच्यात चांगली कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे सिद्ध होते, पण पाचव्या व निर्णायक लढतीत खेळाडूंना अचूक निर्णय घेता आले नाही, त्यामुळे संघाला पराभव स्वीकारावा लागला. झालेल्या चुकांपासून बोध घ्यावा लागेल.’ प्रशिक्षक पुढे म्हणाले,‘भारतात सर्वच संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसून येते. त्यात उपखंडातील व बाहेरच्या संघांचाही समावेश आहे. भारताला भारतात पराभूत करणे कठीण आहे. सलामीवीर टॉम लॅथम व अष्टपैलू मिशेल सँटनर यांनी भारतीय वातावरणाचा चांगला लाभ घेतला. भविष्यात आम्हाला अनेक वन-डे सामने खेळायचे असून युवा खेळाडूंना संधी देण्यास प्रयत्नशील आहोत.’
न्यूझीलंडला पाकसोबत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना १७ नोव्हेंबरपासून ख्राईस्टचर्चमध्ये खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)