किवी पुन्हा अडकले फिरकीच्या जाळ्यात

By admin | Published: October 11, 2016 04:30 AM2016-10-11T04:30:44+5:302016-10-11T04:30:44+5:30

आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनने पुन्हा एकदा अचूक मारा करताना सहा बळी घेतले. त्यामुळे न्यूझीलंड संघ चांगल्या सुरुवातीचा लाभ घेण्यात

Kiwi is trapped again in a spin guard | किवी पुन्हा अडकले फिरकीच्या जाळ्यात

किवी पुन्हा अडकले फिरकीच्या जाळ्यात

Next

इंदूर : आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनने पुन्हा एकदा अचूक मारा करताना सहा बळी घेतले. त्यामुळे न्यूझीलंड संघ चांगल्या सुरुवातीचा लाभ घेण्यात अपयशी ठरला आणि भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेत तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यावर पकड मजबूत केली.
आश्विनने ८१ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. आश्विनने कारकिर्दीत २० व्यांदा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. आश्विनच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचा डाव २९९ धावांत संपुष्टात आला. सहा बळी घेणाऱ्या आश्विनने दोन फलंदाजांना धावबादही केले तर रवींद्र जडेजाने ८० धावांच्या मोबदल्यात उर्वरित दोन बळी घेतले.
भारताने पहिल्या डावात २५८ धावांची आघाडी घेतली असली तरी कर्णधार विराट कोहलीने किवी संघाला फॉलोआॅन न देण्याचा निर्णय घेतला. कोहली (२११) आणि अजिंक्य रहाणे (१८८) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर पहिला डाव ५ बाद ५५७ धावसंख्येवर घोषित करणाऱ्या यजमान भारताने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात बिनबाद १८ धावा केल्या होत्या. भारताकडे एकूण २७६ धावांची आघाडी आहे.
भारतासाठी दिवसाचा शेवट मात्र चांगला झाला नाही. कारण सलामीवीर गौतम गंभीरच्या खांद्याला दुखापत झाली असून, त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. या डावखुऱ्या फलंदाजाने धाव पूर्ण करण्यासाठी खेळपट्टीवर झेप घेतली होती. लोकेश राहुल व शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे गंभीरला संघात स्थान देण्यात आले होते. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. गंभीरने ६ धावा केल्या. आजचा खेळ थांबविण्यात आला त्या वेळी मुरली विजय (११) आणि चेतेश्वर पुजारा (१) नाबाद होते.
त्याआधी, न्यूझीलंडने सोमवारी सकाळच्या सत्रात चांगली सुरुवात केली. मार्टिन गुप्टील (७२ धावा, १० चौकार, २ षटकार ) व टॉम लॅथम (५३) यांनी सलामीला ११८ धावांची भागीदारी केली. एकवेळ किवी संघाची १ बाद १३४ अशी दमदार स्थिती होती, पण त्यानंतर आश्विनच्या गोलंदाजीमुळे पाच षटकांत चित्र बदलले. त्याने डावाच्या ४३ ते ४९ षटकांदरम्यान चार बळी घेतले. त्यामुळे न्यूझीलंडची ५ बाद १४८ अशी अवस्था झाली. त्यानंतर नीशामने (७१) किवी संघाच्या आशा पल्लवीत केल्या; पण आश्विनने त्याला माघारी परतवत डावातील पाचवा बळी नोंदवला. आश्विनने गुप्टील व जीतन पटेल यांना धावबाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नीशामने अर्धशतकी खेळीदरम्यान बी. जे. वॉटलिंग (२३) आणि मिशेल सँटनर (२२) यांच्यासोबत अर्धशतकी भागीदारी नोंदवल्या.
न्यूझीलंडने कालच्या बिनबाद २८ धावसंख्येवरून सुरुवात केली. आजच्या पहिल्या सत्रात भारताला केवळ एक यश मिळाले. दरम्यान, सुरुवातीला गुप्टील व लॅथम यांना नशिबाची साथ लाभली. गुप्टील वैयक्तिक २१ धावांवर असताना मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर दुसऱ्या स्लिपमध्ये रहाणेला त्याचा झेल टिपण्यात अपयश आले. शमीला लॅथमला बाद करण्याचीही संधी होती, पण शॉर्ट मिडविकेटला जडेजाला त्याचा झेल टिपता आला नाही. लॅथम त्या वेळी वैयक्तिक १३ धावांवर होता.
आश्विनने उपाहारानंतर लॅथम, कर्णधार विलियम्सन (८), रॉस टेलर (०) आणि ल्युक रोंची (०) यांना बाद केले. आश्विनने अर्धशतकी खेळी करणाऱ्या गुप्टीलला धावबाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रोंचीचा फटका आश्विनच्या बोटाला चाटून नॉन स्ट्रायकर एंडच्या यष्टीवर आदळला. दुर्दैवाने त्या वेळी गुप्टील क्रिझच्या बाहेर होता. त्यानंतर आश्विनने अशाच पद्धतीने पटेलला (१८) तंबूचा मार्ग दाखवला. (वृत्तसंस्था)
आश्विनने बेदी, प्रसन्ना व गुप्ते यांना सोडले पिछाडीवर-
च्आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने भारतीय क्रिकेट इतिहासातील दिग्गज फिरकीपटू बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना अणि सुभाष गुप्ते यांच्यासह वेगवान गोलंदाज झहीर खान यांना पिछाडीवर सोडले.
च्आश्विनने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी सोमवारी पहिल्या डावात ८१ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. आश्विनने न्यूझीलंडविरुद्ध पाचव्यांदा डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली. आश्विनने या कामगिरीसह डावखुरे फिरकीपटू बेदी, लेग स्पिनर गुप्ते आणि आॅफ स्पिनर प्रसन्ना व झहीर खान यांना पिछाडीवर सोडले. या गोलंदाजांनी न्यूझीलंडविरुद्ध चार वेळा डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली आहे.
च्सर्वांत वेगवान २० वेळा डावात ५ बळी घेण्याची कामगिरी करणाऱ्यांमध्ये ३० वर्षीय आश्विन तिसऱ्या स्थानी आहे. त्याने ३९व्या कसोटीत हा पराक्रम केला. इंग्लंडचे सिडनी बार्नेस यांनी २५ कसोटींत आणि आॅस्ट्रेलियाचे क्लेरेंस ग्रिमेट यांनी ३७ कसोटी सामन्यांत अशी कामगिरी केली होती.
च्आश्विनने फॉलोआॅन न देण्याची भारताची रणनीती योग्य असल्यााचे सांगितले. ‘‘मी व जडेजा मोठे स्पेल टाकून थकलो होतो; त्यामुळे फॉलोआॅन न देण्याचा निर्णय योग्यच होता,’’ असे आश्विन म्हणाला.
लॅथमला दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून
चमकदार कामगिरीची आशा-
च्लॅथम व गुप्टिल यांनी पहिल्या डावात सलामीला शतकी भागीदारी केली; पण न्यूझीलंडचा डाव २९९ धावांत संपुष्टात आला.
च्तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना लॅथम म्हणाला, ‘‘होळकर स्टेडियमची खेळपट्टी खराब होत असून, चेंडू अधिक वळत आहेत. आज आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. आम्ही एकापाठोपाठ विकेट गमावल्यामुळे निराश झालो. दुसऱ्या डावात यात निश्चितच सुधारणा करू.’’
च्लॅथम पुढे म्हणाला, ‘‘खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल ठरत आहे. फुटमार्कमुळे फिरकीपटूंना मदत मिळत आहे. दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटू या फुटमार्कचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतील; पण कामगिरीत सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न राहील.’’
धावफलक
भारत पहिला डाव ५ बाद ५५७ (डाव घोषित).
न्यूझीलंड पहिला डाव :- मार्टिन गुप्टील धावबाद ५३, टॉम लॅथम झे. व गो. आश्विन ५३, केन विलियम्सन त्रि. गो. आश्विन ०८, रॉस टेलर झे. रहाणे गो. आश्विन ००, ल्युक रोंची झे. रहाणे गो. आश्विन ००, जेम्स नीशाम पायचित गो. आश्विन ७१, बी.जे. वॉटलिंग झे. रहाणे गो. जडेजा २३, मिशेल सँटनर झे. कोहली गो. जडेजा २२, जीतन पटेल धावबाद १८, मॅट हेन्री नाबाद १५, ट्रेंट बोल्ट झे. पुजारा गो. आश्विन ००. अवांतर (१७). एकूण ९०.२ षटकांत सर्व बाद २९९. बाद क्रम : १-११८, २-१३४, ३-१४०, ४-१४८, ५-१४८, ६-२०१, ७-२५३, ८-२७६, ९-२९४, १०-२९९. गोलंदाजी : शमी १३-१-४०-०, उमेश यादव १५-१-५५-०, आश्विन २७.२-५-८१-६, जडेजा २८-५-८०-२, विजय ७-०-२७-०.
भारत दुसरा डाव : मुरली विजय खेळत आहे ११, गौतम गंभीर रिटायर्ड हर्ट ०६, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ०१. अवांतर (०). एकूण ६ षटकांत बिनबाद १८. गोलंदाजी : बोल्ट ३-०-९-०, पटेल २-०-८-०, सँटनर १-०-१-०.

Web Title: Kiwi is trapped again in a spin guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.