किवी अडचणीत
By admin | Published: October 2, 2016 12:24 AM2016-10-02T00:24:25+5:302016-10-02T00:24:25+5:30
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या (५ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची ७ बाद १२८ अशी अवस्था करून दुसऱ्या
कोलकाता : वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या (५ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची ७ बाद १२८ अशी अवस्था करून दुसऱ्या कसोटी सामन्यावरील पकड मजबूत केली. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी बीजे वॉटलिंगला (१२) जीतेन पटेल (०५) साथ देत होता.
त्याआधी, कालच्या ७ बाद २३९ धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताचा पहिला डाव ३१६ धावांत संपुष्टात आला. रिद्धिमान साहाने (५४) नाबाद अर्धशतकी खेळी केली. न्यूझीलंडला भारताची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप १८८ धावांची गरज असून, त्यांच्या ३ विकेट शिल्लक आहेत.
न्यूझीलंडने आज दुसऱ्या दिवशी केवळ ३४ षटके खेळली. पावसाच्या व्यत्ययाने मैदान खेळण्यायोग्य नसल्यामुळे आणि अंधुक प्रकाशामुळे बराच वेळ खेळ शक्य झाला नाही. भारताची पहिल्या दिवसअखेर ७ बाद २३९ अशी नाजूक अवस्था होती; पण आज यजमान संघाने दमदार पुनरागमन केले. तळाच्या फलंदाजांनी उल्लेखनीय योगदान देत भारताला ३००चा पल्ला ओलांडून दिला. प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडची चहापानापर्यंत ४ बाद ८५ अशी अवस्था होती. भुवनेश्वरने अचूक मारा करीत ५ बळी घेतले. पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ सुरू झाल्यावर भुवनेश्वरने प्रभारी कर्णधार रॉस टेलर (३६), मिशेल सँटेनर (११) आणि मॅट हेन्री (००) यांना माघारी परतवले. मोहंमद शमीने (१-४६) दुसऱ्या टोकाकडून त्याला योग्य साथ दिली.
उपाहारानंतर न्यूझीलंडची ३ बाद २३ अशी अवस्था झाली होती. भुवनेश्वरने निकोल्सला क्लीन बोल्ड केले. टेलर व ल्युक रोंची (३५) यांनी चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जडेजाने रोंचीला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्याआधी रोंची वैयक्तिक १६ धावांवर असताना सुदैवी ठरला. गौतम गंभीर त्याचा झेल टिपण्यात अपयशी ठरला.
दरम्यान भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा फ्लूमुळे आजारी आहे. आज (शनिवारी) तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात नव्हता. (वृत्तसंस्था)