केकेआर-डेअरडेव्हिल्स लढत आज
By admin | Published: April 17, 2017 01:29 AM2017-04-17T01:29:59+5:302017-04-17T01:29:59+5:30
गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला आज, सोमवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
नवी दिल्ली : गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला आज, सोमवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दोन विजय मिळवणाऱ्या दिल्ली संघाचाही आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्यामुळे उभय संघांदरम्यान सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्यानिमित्ताने रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळेल.
केकेआरने गुजरात लायन्सविरुद्ध विजय मिळवत यंदाच्या मोसमाची शानदार सुरुवात केली. त्यानंतर त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. केकेआरने किंग्ज इलेव्हन पंजाब व सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवत गुणतालिकेत आघाडीच्या स्थानावर झेप घेतली.
दुसऱ्या बाजूचा विचार करताना सलामी लढतीत रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागणाऱ्या दिल्ली संघाने त्यानंतर सलग दोन विजय मिळवत प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे. दिल्ली संघाला या वेळी गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळेल, पण स्पर्धेत आतापर्यंत सर्वांत प्रभावी भासत असलेल्या केकेआर संघाला पराभूत करण्याचे त्यांच्यापुढे आव्हान राहील. केकेआर संघाच्या विजयात आॅरेंज कॅपचा मानकरी व कर्णधार असलेल्या गौतम गंभीरची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. संघाला ख्रिस लीनची उणीव भासत असली तरी उथप्पा, पांडे व युसूफ पठाण यांच्या समावेशामुळे संघाची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. कुलदीप यादव, सुनील नरेन व पठाण या तीन फिरकीपटूंसह उमेश यादव, ख्रिस व्होक्स व ट्रेंट बोल्ट या केकेआरची वेगवान गोलंदाजांमुळे गोलंदाजीची बाजू बळकट आहे. (वृत्तसंस्था)
दिल्ली संघाची भिस्त यंदाच्या मोसमातील एकमेव शतकवीर संजू सॅम्सन, सॅम बिलिंग्स, ऋषभ पंत, कोरी अँडरसन व ख्रिस मॉरिस यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. गोलंदाजीमध्ये कर्णधार झहीरसह ख्रिस मॉरिस, शाहबाज नदीम, पॅट कमिन्स हे चांगले फॉर्मात आहेत.