विजयासाठी केकेआर उत्सुक
By admin | Published: May 25, 2016 03:09 AM2016-05-25T03:09:54+5:302016-05-25T03:09:54+5:30
फिरकीपटूंच्या कामगिरीच्या जोरावर ‘करा अथवा मरा’ लढतीत सरशी साधत अंतिम चार संघांत स्थान मिळवणारा व दोनदा जेतेपदाचा मानकरी ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्स
नवी दिल्ली : फिरकीपटूंच्या कामगिरीच्या जोरावर ‘करा अथवा मरा’ लढतीत सरशी साधत अंतिम चार संघांत स्थान मिळवणारा व दोनदा जेतेपदाचा मानकरी ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला बुधवारी एलिमिनेटर लढतीत सनरायझर्स हैदराबाद संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या लढतीत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजय मिळवणाऱ्या केकेआर संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे.
गुणतालिकेत बऱ्याच कालावधीपर्यंत अव्वल स्थानावर राहिलेल्या सनरायझर्स संघाला गेल्या लढतीत २२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि त्यामुळे त्यांना एलिमिनेटर लढतीत खेळावे लागले. सनरायझर्सने १४ सामन्यांत ८ विजय मिळवले आणि ६ लढतींत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या खात्यावर १६ गुणांची नोंद होती, पण रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाच्या तुलनेत नेटरनरेटमध्ये पिछाडीवर पडल्यामुळे त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. केकेआरविरुद्ध लीग फेरीत त्यांना दोन्ही लढतींमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. प्लेआॅफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी केकेआर संघाला गेल्या लढतीत कुठल्याही स्थितीत विजय मिळवणे आवश्यक होते. केकेआरचा हुकमी एक्का फिरकीपटू सुनील नारायणने योग्य वेळी सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. केकेआर संघाला दोनदा जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नारायणला यंदाच्या मोसमात लीग फेरीतील अखेरची लढत वगळता लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, पण आता त्याला सूर गवसला आहे. लेगस्पिनर पियुष चावलाच्या स्थानी संधी मिळालेल्या यादवने महिनाभरानंतर लीगमध्ये आपली दुसरी लढत खेळताना चमकदार कामगिरी केली. २०१२ व २०१४ चा चॅम्पियन केकेआर संघाच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार गौतम गंभीर, फॉर्मात आलेला बिगहिटर युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडे यांच्या कामगिरीवर राहील. केकेआरचा स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल दुखापतीमुळे खेळू शकला नाही.
(वृत्तसंस्था)
बुधवारच्या लढतीपर्यंत तो फिट होईल, अशी संघव्यवस्थापनाला आशा आहे. गोलंदाजीमध्ये नारायण व यादव यांनी शानदार कामगिरी केली आहे, तर वेगवान गोलंदाजांकडून गंभीरला चमकदार कामगिरीची आशा आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता गेल्या लढतीत १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला १४९ धावाच करता आल्या. हैदराबाद संघाची भिस्त कर्णधार डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन आणि युवराज सिंग यांच्या कामगिरीवर अवलंबूून आहे.
दुखापतग्रस्त असल्यामुळे साखळी फेरीत केवळ सात सामने खेळणाऱ्या युवराजला अद्याप वैयक्तिक अर्धशतक नोंदविता आले नाही. मोठ्या लढतीचा खेळाडू मानल्या जाणाऱ्या या स्टार अष्टपैलूकडून संघाला शानदार कामगिरीची अपेक्षा आहे. सनरायझर्स संघाच्या यशाचे रहस्य त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे. भुवनेश्वर कुमारने १४ सामन्यांत १८ बळी घेतले आहेत. आरसीबीच्या युजवेंद्र चहलनंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने १४ सामन्यांत १६ बळी घेतले आहेत. केकेआरविरुद्ध गेल्या लढतीत त्याने १९ व्या षटकात गोलंदाजी करताना केवळ तीन धावा दिल्या होत्या. युवा वेगवान गोलंदाज बरिंदर सरणची कामगिरीही उल्लेखनीय ठरली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
कोलकाता नाईट रायडर्स :- गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, युसूफ पठाण, शाकिब-अल-हसन, पियुष चावला, सुनील नारायण, जेसन होल्डर, मोर्नी मॉर्केल, अंकित राजपूत, आंद्रे रसेल, ख्रिस लिन, ब्रॅड हॉग, कॉलीन मुन्रो, शॉन टेट, उमेश यादव, शेल्डन जॅक्सन, कुलदीप यादव, मनन शर्मा, राजागोपाल सतीश, जयदेव उनाडकट.
सनराझर्स हैदराबाद :- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, युवराज सिंग, मोझेस हेन्रिक्स, इयान मॉर्गन, दीपक हुडा, नमन ओझा, कर्ण शर्मा, मुस्तफिजूर रहमान, भुवनेश्वर कुमार, बरिंदर सरण, ट्रेंट बोल्ट, बेन कटिंग, केन विलियम्सन, आशिष रेड्डी, रिकी भुई, बिपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, अभिमन्यू मिथुन, विजय शंकर, टी. सुमन, आदित्य तारे.