केकेआर नंबर वन : दिल्ली डेअरडेव्हिल्सवर चार गड्यांनी मात
By admin | Published: April 18, 2017 01:54 AM2017-04-18T01:54:04+5:302017-04-18T01:54:04+5:30
मनीष पांडेच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर दोन वेळचा विजेता कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सला सोमवारी आयपीएल-१० मध्ये चार गड्यांनी
नवी दिल्ली : मनीष पांडेच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर दोन वेळचा विजेता कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सला सोमवारी आयपीएल-१० मध्ये चार गड्यांनी पराभूत करीत सलग तिसरा विजय नोंदविला. नाणेफेक गमविल्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या केकेआरने दिल्लीला ७ बाद १६८ धावांवर रोखले. नंतर एक चेंडू शिल्लक राखून ६ बाद १६९ धावा करीत सामना जिंकला.
मनीष पांडे याने ४९ चेंडूत चार चौकार तसेच तीन षटकारांसह नाबाद ६९ धावा ठोकल्या. ५९ धावांचे योगदान देत युसूफ पठाण हा देखील फॉर्ममध्ये परतला आहे. विजयानंतर चार सामन्यात आठ गुणांसह केकेआर संघ अव्वल स्थानावर आला. अखेरच्या षटकात ९ धावांची गरज असताना पांडेने चौथ्या चेंडूवर षटकार मारताच दिल्लीच्या आशा धुळीस मिळाल्या.
त्याआधी, सलामीवीर संजू सॅमसन (३९) व रिषभ पंत (३८) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने ८ बाद १६८ अशी मजल मारली. संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात पंतने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने केवळ १६ चेंडूंना सामोरे जाताना २ चौकार व ४ षटकार ठोकले. दिल्ली संघातर्फे पहिला षटकार नोंदवला. डावातील चारही षटकार त्यानेच ठोकले. ख्रिस मॉरिसने अखेर नेहमीप्रमाणे उपयुक्त योगदान देताना ३ चौकारांच्या साहाय्याने १४ धावा फटकावल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सॅम बिलिग्स व यंदाच्या मोसमातील पहिला शतकवीर सॅमसन यांनी चांगली सुरुवात करून दिली. सॅमसनने पहिल्याच षटकात दोन चौकार ठोकत आपला निर्धार जाहीर केला. आक्रमक सॅमसनला बिलिंग्सने योग्य साथ दिली. सॅमसनने डावाच्या तिसऱ्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर चार चौकार ठोकताना १७ धावा वसूल केल्या. उमेशनेच त्याला माघारी परतवले. नॅथन कुल्टर नाईलने सातव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बिलिंग्सला (२१) माघारी परतवले आणि सलामीची ५३ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर धावसंख्येत १० धावांची भर पडली असताना सॅमसनही बाद झाला. त्यानंतर करुण नायर (२१) आणि श्रेयस अय्यर (२६) यांनी जबाबदारीपूर्ण खेळ केला. अय्यर धावबाद झाला तर नायर त्यानंतरच्या पुढच्याच षटकात तंबूत परतला. त्यानंतर रिषभ पंतची कमाल अनुभवाला मिळाली. त्याने डावातील पहिला षटकार १६ व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर लगावला.(वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ७ बाद १६८ (संजू सॅमसन ३९, सॅम बिलिंग्स २१, करुण नायर २१, श्रेयस अय्यर २६, रिषभ पंत ३८, ख्रिस मॉरिस १६; कुल्टर नाईल ३-२२, ख्रिस व्होक्स, उमेश यादव, सुनील नरेन प्रत्येकी एक बळी) कोलकाता नाईट रायडर्स : १९.५ षटकांत ६ बाद १६९ धावा(मनीष पांडे नाबाद ६९, युसूफ पठाण ५९,गौतम गंभीर १४, जहीर खान २/२८, पॅट कमिन्स २/३९.)