केकेआर विजयी

By admin | Published: April 20, 2016 03:27 AM2016-04-20T03:27:10+5:302016-04-20T03:27:10+5:30

गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यानंतर सलामीवीर रॉबिन उथप्पाने केलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये आपला तिसरा

KKR won | केकेआर विजयी

केकेआर विजयी

Next

मोहाली : गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यानंतर सलामीवीर रॉबिन उथप्पाने केलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये आपला तिसरा विजय नोंदवताना किंग्ज इलेव्हन पंजाबला ६ विकेटनी नमविले. पंजाबच्या १३८ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याने १७.१ षटकांत ४ बाद १४१ धावा केल्या.
आय. एस. बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याने यजमान पंजाबला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. गोलंदाजांनी पंजाबला रोखल्यानंतर उथप्पाने जबरदस्त फटकेबाजी करताना संघाला विजयी केले. उथप्पा आणि कर्णधार गौतम गंभीर यांनी सावध सुरुवात करताना खेळपट्टीचा अंदाज घेतला. एका बाजूने उथप्पाने फटकेबाजी करून कोलकात्याच्या धावसंख्येला वेग दिला. गंभीरनेही जास्तीत जास्त उथप्पाला स्ट्राइक देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ८.३ षटकांत ८२ धावांची शानदार सलामी दिली.
उथप्पा अर्धशतक झळकवून लगेच बाद झाला. त्याने २८ चेंडूंत ९ चौकारांसह ५३ धावा फटकावल्या. यानंतर गंभीरही ३४ चेंडूंत ३४ धावा काढून परतला. दोघेही झटपट बाद झाल्यानंतर कोलकात्याच्या धावसंख्येला खीळ बसली. मात्र, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव व युसूफ पठाण यांनी संघाला विजय मिळवून दिला. पंजाबकडून अक्षर पटेल व प्रदीप साहू यांनी चांगला मारा करताना प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी, अडखळत्या सुरुवातीनंतर आक्रमक फलंदाज शॉन मार्शने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने निर्धारित षटकांत ८ बाद १३८ धावांची मजल मारली. मार्शने ४१ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५६ धावा केल्या. तर, मुरली विजयने २२ चेंडूंत २६ धावा काढल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज चमक दाखवू शकला नाही. गोलंदाजीत मॉर्नी मॉर्केल (२/२७) व सुनील नरेन (२/२७) यांनी अचूक मारा करून पंजाबला रोखले.(वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ८ बाद १३८ धावा (शॉन मार्श नाबाद ५६, मुरली विजय २६; सुनील नरेन २/२२, मॉर्नी मॉर्केल २/२७) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १७.१ षटकांत ४ बाद १४१ धावा (रॉबिन उथप्पा ५३, गौतम गंभीर ३४; प्रदीप साहू २/१८, अक्षर पटेल २/१९).

Web Title: KKR won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.