केकेआरचे मिशन ‘दिल्ली’
By admin | Published: April 28, 2017 02:07 AM2017-04-28T02:07:44+5:302017-04-28T02:07:44+5:30
धडाकेबाज विजयांमुळे आत्मविश्वास उंचावलेला कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१० मध्ये उद्या (शुक्रवारी) दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमविण्याच्या इराद्याने उतरणार आहे.
कोलकाता : धडाकेबाज विजयांमुळे आत्मविश्वास उंचावलेला कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१० मध्ये उद्या (शुक्रवारी) दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमविण्याच्या इराद्याने उतरणार आहे.
केकेआरने यंदा शानदार खेळ केला. आठ सामन्यांत संघाचे १२ गुण झाले. दुसरीकडे, डेअरडेव्हिल्सचे ६ सामन्यांत चारच गुण झाले. त्यामुळे संघ आठव्या स्थानावर पोहोचला. आरसीबीला ४९ धावांत गुंडाळल्यानंतर केकेआरने काल रायझिंग पुणे सुपरजायंटला ७ गड्यांनी पराभूत केले, तर मागच्या तिन्ही सामन्यांत पराभूत झालेला दिल्ली संघ ६ दिवसांनंतर सामना खेळणार आहे. कर्णधार झहीर खान आणि कोच राहुल द्रविड यांना ब्रेकनंतर खेळण्याचा लाभ होईल, अशी अपेक्षा आहे. या संघाकडे पॅट कमिन्स, ख्रिस मॉरिस आणि कासिगो रबाडा हे चांगले गोलंदाज असून, झाहीर आणि मोहंमद शमी हे अनुभवी गोलंदाज आहेत.
केकेआरसाठी सुरुवातीपासून धावांचा धडाका लावणारा सुनील नारायण याला रोखण्याचे आव्हान या सर्व गोलंदाजांपुढे असेल. याशिवाय, काल रॉबिन उथप्पा आणि गौतम गंभीर यांनी धावांचा पाऊस पाडून पुण्याला सहज पराभूत केले होते. गोलंदाजीत चायनामॅन कुलदीप यादव याने महेंद्रसिंह धोनी तसेच मनोज तिवारी यांना तंबूची वाट दाखविली होती. (वृत्तसंस्था)