के.एम.सी., शिवाजीचा चिवट खेळाडू

By admin | Published: February 11, 2017 12:34 AM2017-02-11T00:34:52+5:302017-02-11T00:34:52+5:30

संदीप पाटील

KMC, Shiva's tough players | के.एम.सी., शिवाजीचा चिवट खेळाडू

के.एम.सी., शिवाजीचा चिवट खेळाडू

Next

संदीप पाटीलने फुटबॉलपटू म्हणून दिर्घकाळ कारकिर्द गाजवली. विद्यापीठ स्तरावरील स्पर्धात विशेष चमकला. आखिल भारतीय विद्यापीठ स्तरावरही त्याला खेळण्याची संधी मिळाली. फुटबॉलबरोबरच धावणे, लांब उडी यामध्येही त्याने प्राविण्य मिळवले होेते. शिवाजी मंडळाच्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात सध्या तो व्यस्त असतो.क२
संदीप बाबूराव पाटील याचा जन्म १० सप्टेंबर १९७० रोजी झाला. मरगाई गल्लीत राहत असल्याने लहानपणीच तो फुटबॉलकडे ओढला गेला. शिवाजी मराठा हायस्कूलचे मैदान, पद्मा गार्डन मैदान, न्यू कॉलेज मैदान व गांधी मैदान या ठिकाणी संदीप फुटबॉलचा सराव करीत असे. ४ फूट ११ इंच उंचीच्या स्पर्धा खेळून संदीपची हाफ व फुलबॅकची जागा निश्चित झाली. स. म. लोहिया हायस्कूलमध्ये असताना त्याने शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये फारसा भाग घेतला नाही. मात्र, त्याच काळात शिवाजी तरुण मंडळ ‘ब’ संघातून तो प्रकाशात आला. त्याने काही काळ के.एम.सी. संघातूनही खेळण्यास सुरुवात केली.
संदीपने वयाच्या १४व्या वर्षांपासून विविध क्लबमधून फुटबॉल खेळास सुरुवात केली. त्याचा बॅकचा चिवट व तडफदार खेळ पाहून तत्काळ त्याची शिवाजी तरुण मंडळाच्या सीनियर संघात निवड झाली. या संघात तो दीर्घकाळ खेळला. त्याला घरातून पूर्ण पाठिंबा होताच शिवाय दिलीप माने, अमर सासने, विवेक पोवार यांची प्रेरणा होती. शिवाजी तरुण मंडळामधून खेळताना संदीपच्या खेळाने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्याच्या बॅक व हाफच्या खेळात एक प्रकारचा शांतपणा होता. घाईगडबड, चंचलता अजिबात नव्हती. पाठीमागून ग्राऊंड पास व ओव्हर हेड पास अचूक असत. हाफ या प्लेसवरून खेळताना आपल्या फॉरवर्डच्या सवंगड्यास योग्य बॉल सप्लाय तो देत असे. पाठीमागे प्रतिस्पर्धी सोडणार नाही इतकी त्याची बाजू चिवट. त्याच्या व्हॉली किक, हाय ड्राईव्ह, व्हॉली शॉट व हेड यामध्ये जोश होता. शिवाजी तरुण मंडळाकडून खेळत असताना त्याचवेळी त्याची न्यू कॉलेजच्या फुटबॉल संघात निवड झाली.
या कॉलेजमधून झोन, इंटर झोन सामने जिंंकत शिवाजी विद्यापीठ संघात सलग तीन वर्षे त्याची निवड झाली. चंदीगड (पंजाब), जबलपूर (मध्य प्रदेश), गोवा येथील विद्यापीठ स्तरावरील सामन्यांत संदीप पाटीलचा बॅक व हाफ (मिड फिल्ड) दाद देऊन गेला. याच दरम्यान त्याची आॅल इंडिया विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. विद्यापीठ स्तरावर त्याने चमकदार कामगिरी केली.
गांधी मैदानावर सराव करणाऱ्या दिलीप माने, निवास जाधव, राजू कदम, राजू पंदारे, मनोज साळोखे, रवी साळोखे, बबन सुतार, अकबर मकानदार या वरिष्ठ खेळांडूचा खेळ पाहून संदीपने खेळाचे बरेचसे तंत्र आत्मसात केले. फुटबॉल संदर्भात संदीपची एक आठवण अशी की, पी.टी.एम. व शिवाजी मंडळाचा सामना सुरू होता. पी.टी.एम.दोन गोल्स्नी आघाडीवर होता; मात्र शेवटच्या पाच मिनिटांत दोन्ही गोल्स्ची परतफेड करून संदीपने हा सामना टायब्रेकमध्ये जिंंकला. संदीपच्या या सामन्यातील मिल्डफिल्ड खेळाने प्रेक्षक त्याच्यावर खूश झाले होते.
आज जरी संदीपने खेळणे थांबविले असले तरी शिवाजी तरुण मंडळ या संघास आजही प्रशिक्षण देत आहे. शालेय स्तरावर असताना संदीपने धावणे, लांबउडीे यामध्येही प्रावीण्य प्राप्त केले होते. संदीप अबोल, अजातशत्रू खेळाडू होता. आपल्या शांत स्वभावाने इतरांची मने जिंकणारा, रेफ्रीचे नियम अवलंबणारा हा खेळाडू.
(उद्याच्या अंकात : मेहबूब शिकलगार)

Web Title: KMC, Shiva's tough players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.