कोच्ची टस्कर्सला आयपीएलमध्ये सहभाग हवा
By Admin | Published: July 9, 2015 01:14 AM2015-07-09T01:14:27+5:302015-07-09T01:14:27+5:30
आयपीएलमध्ये सहभागी असलेला माजी संघ कोच्ची टस्कर्सला ५५० कोटींची नुकसानभरपाईची शिफारस करणाऱ्या माजी मुख्य न्या. आर. सी. लाहोटी यांच्या अहवालाला आव्हान देण्याची
नवी दिल्ली : आयपीएलमध्ये सहभागी असलेला माजी संघ कोच्ची टस्कर्सला ५५० कोटींची नुकसानभरपाईची शिफारस करणाऱ्या माजी मुख्य न्या. आर. सी. लाहोटी यांच्या अहवालाला आव्हान देण्याची बीसीसीआयने तयारी केली आहे. कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०११मध्ये बीसीसीआयने या संघाला निलंबित केले होते. लवादाचा निर्णय कोच्चीच्या बाजूने आला आहे; पण कोच्ची संघ ५५० कोटी परत घ्यायच्या विचारात नसून, त्यांना यंदा आयपीएलमध्ये संघ खेळविण्याची इच्छा असल्याचे सूत्रांचे मत आहे.
आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी संचालन परिषदेच्या बैठकीनंतर सांगितले, की लाहोटी अहवाल मिळाला आहे. या अहवालाला आव्हान द्यावे, असे अनेक सदस्यांचे मत पडले. कायदेशीर सल्ला घेत आहोत. बीसीसीआयने ही रक्कम न दिल्यास त्यावर १८ टक्के व्याजाची तरतूद आहे. बीसीसीआयने २०११ मध्ये कोच्ची संघाचा करार रद्द करून त्यांची बँक गॅरंटी स्वत:कडे घेतली होती. हे प्रकरण लाहोटी लवादाकडे गेले. चेन्नई सुपरकिंग्सच्या मूल्यांकनाचा निर्णय संचालन परिषदेने बोर्डाच्या कार्य समितीकडे सोपविला असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. कोलकाता येथील बोर्डाच्या मागच्या बैठकीत कार्य समितीने कायदेशीर सल्ला मागितला होता. कायद्यानुसार काय होऊ
शकते, याची माहिती मिळाल्यानंतर संचालन परिषदेच्या बैठकीत
पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे शुक्ला म्हणाले.
चॅम्पियन्स टी-२० लीगबाबतही कुठलाच निर्णय झाला नाही. सीएसए आणि सीएच्या उपस्थितीत हा निर्णय शक्य असल्याची माहिती शुक्ला यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘चॅम्पियन्स लीग बंद करण्याचा निर्णय घेतला नाही; पण त्यावर संचालन परिषद निर्णय घेईल. कारण संचालन परिषदेत सीएसए आणि सीएचा समावेश आहे. चॅम्पियन्स लीग
दर वर्षी सप्टेंबरमध्ये होते; पण प्रायोजक आणि प्रेक्षकांमध्ये या लीगबाबत उत्साह नाही.’’(वृत्तसंस्था)