बँगलोर प्लेआॅफसाठी ‘कोहली’फाय

By admin | Published: May 23, 2016 01:19 AM2016-05-23T01:19:48+5:302016-05-23T01:19:48+5:30

दिल्लीकर विराट कोहलीे (५४*) याने केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरने दिल्ली डेअरडेव्हिल्सला ६ विकेट्सनी हरवून आयपीएल स्पर्धेची प्लेआॅफ फेरी गाठली.

'Kohli' for Bangalore Playboy | बँगलोर प्लेआॅफसाठी ‘कोहली’फाय

बँगलोर प्लेआॅफसाठी ‘कोहली’फाय

Next

रायपूर : दिल्लीकर विराट कोहलीे (५४*) याने केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरने दिल्ली डेअरडेव्हिल्सला ६ विकेट्सनी हरवून आयपीएल स्पर्धेची प्लेआॅफ फेरी गाठली.
आयपीएलच्या नवव्या पर्वातील शेवटचा सामना दिल्ली आणि बँगलोर या दोन्ही संघासाठी ‘जिंका किंवा बाहेर व्हा’ अशीच ठरली होती. पण, एखाद्या लढाऊ योद्ध्याप्रमाणे संघाला तळातून प्लेआॅफच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन आलेल्या विराट कोहलीने आजही लढावू बाण्याने अर्धशतक करून संघाला सलग चौथ्या विजयासह थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचविले. बँगलोरच्या गोलंदाजांनी दिल्लीला ८ बाद १३८ असे मर्यादित धावसंख्येवर रोखल्यानंतर बँगलोरने हे आव्हान ११ चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले.
लक्ष्य छोटे असले, तरी बँगलोरची सुरुवात निराशाजनक झाली. गेल (१) आणि ए. बी. डिव्हिलियर्स (६) हे दोघे केवळ १७ धावांत तंबूत परतल्याने बँगलोरवर दबाव आला, पण ‘सेनापती’ कोहलीने के. एल. राहुलच्या साथीने संघाची डळमळणारी नौका स्थिर केली. राहुल (३८) आणि वॉटसन (१४) हे पाठोपाठ बाद झाल्याने दिल्लीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या; परंतु कोहलीने कोणतीही ‘रिस्क’ न घेता स्टुअर्ट बिन्नीच्या साथीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून फलंदाजी करणाऱ्या दिल्ली संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि ऋषभ पंत फक्त एका धावेवर श्रीनाथ अरविंदच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन बाद झाला. विशेष म्हणजे अरविंदच्या गोलंदाजीवर सलामीवीर डिकॉकदेखील सुदैवी ठरला. त्या वेळेस बॅकवर्ड पॉइंटला जॉर्डनने त्याचा कठीण झेल सोडला.
डिकॉकने नंतर अरविंदच्या पुढच्या षटकात षटकार व चौकार मारला. करुण नायर (११) यानेदेखील शेन वॉट्सनला षटकार ठोकला; परंतु लेगस्पिनर चहलच्या चेंडूवर कर्णधार विराट कोहलीने मागे धावत जाताना त्याचा शानदार झेल टिपला. दिल्लीला पॉवरप्लेमध्ये २ बाद ४३ धावाच करता आल्या.
संजू सॅमसन (१७) याने चहलच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि पुढच्या षटकातही चौकार मारला; परंतु याच गोलंदाजाच्या पुढच्या चेंडूवर तो राहुलच्या हाती झेल देऊन बसला.
सॅम बिलिंग्जदेखील चार धावांवर जॉर्डनच्या गोलंदाजीवर गेलकरवी झेलबाद झाला. अरविंदने जॉर्डनच्या याच षटकात पवन नेगीला जीवदान दिले. त्या वेळेस नेगीने खातेही उघडले नव्हते. संक्षिप्त धावफलक :
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २0 षटकांत ८ बाद १३८. (क्विंटन डीकॉक ६0, सॅमसन २७, चहल ३/३२, गेल २/११)
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : १८.१ षटकांत ४ बाद १३९. (विराट कोहली ५४*, के. एल. राहुल ३८. ब्रेथवेट १/१८)

Web Title: 'Kohli' for Bangalore Playboy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.