धडाकेबाज कोहली ठरला 'मोस्ट मार्केटेबल प्लेअर', मेस्सी, जोकोविचवर केली मात
By admin | Published: May 27, 2016 10:45 AM2016-05-27T10:45:26+5:302016-05-27T10:45:58+5:30
अष्टपैलू खेळाडू विराट कोहली 'मोस्ट मार्केटेबल प्लेअर्स'च्या यादीत तिस-या स्थानावर आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - आयपीएलच्या नवव्या सत्रात धावांची टांकसाळ उघडणारा, कसोटी क्रिकेटमध्येही खंबीरपणे भारतीय संघाचे नेतृत्व करणारा अष्टपैलू खेळाडू विराट कोहली सध्या सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत बनला आहे. चाहते त्याच्या प्रेमात आहेतच, पण अनेक कंपन्यानांही त्याची भुरळ पडली असून परिणामी त्याने 'मोस्ट मार्केटेबल प्लेयर'च्या यादीत प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सी तसेच जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचलाही मागे टाकले आहे.
जागतिक स्तरावरच्या 'स्पोर्ट्स-प्रो' या मॅगझिनद्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये 'मोस्ट मार्केटेबल प्लेअर'च्या यादीत विराट सध्या तिस-या स्थानावर असून या यादीत एनबीएचा प्रसिद्ध बास्केटबॉलपटू स्टीफन करी आणि जुवेन्टसचा फुटबॉलपटू पॉल पोग्बा अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहे. 'स्पोर्ट्स प्रो’कडून दरवर्षी प्रसिद्ध खेळाडूंचे बाजारातील मूल्य, वय, त्यांचा करिश्मा या निकषांवर संशोधन करून त्यांची पत ठरवली जाते. टेनिसपटू नोव्हाक जोकोविच २३ व्या, फूटबॉलपटू लिओनल मेस्सी २७ व्या आणि प्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट या यादीत ३१ व्या क्रमांकावर आहेत.
यापूर्वी विराटने मैदानावरील उत्पादन जाहीरातीमध्ये भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले होते. कोहलीच्या बॅटवर एमआरएफचा स्टिकर असून त्यासाठई त्याला आठ कोटी रुपये मिळतात. तसेच सरावाच्यावेळी पोषाख आणि बूटांची जाहीरात करण्याचे विराटला आणखी दोन कोटी रुपये मिळतात. तसेच सध्या सोशल मीडियावरही तोच सरस ठरला असून ट्विटर, फेसबूक आणि इन्स्ट्राग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कोहलीची सर्वात जास्त चर्चा होत असते व तोच ट्रेंडिंगमध्ये असतो.