कोहली सर्वश्रेष्ठ फलंदाज
By admin | Published: November 13, 2016 02:33 AM2016-11-13T02:33:17+5:302016-11-13T02:33:17+5:30
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा विध्वंसक फलंदाज एबी डिव्हीलियर्स आणि इंग्लंडचा जो रुट जगातील सर्वश्रेष्ठ तीन फलंदाज आहेत
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा विध्वंसक फलंदाज एबी डिव्हीलियर्स आणि इंग्लंडचा जो रुट जगातील सर्वश्रेष्ठ तीन फलंदाज आहेत, असे मत आॅस्टे्रलियाचा
माजी धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट याने व्यक्त केले.
आॅस्टे्रलियाच्या शिक्षण प्रतिनिधी मंडळासह कर्नाटकाच्या मणिपाल दौऱ्यावर आलेल्या गिलिख्रिस्टने सांगितले, ‘‘मी सध्या भारतात आहे म्हणून असे बोलत नाही. तर, ही वस्तुस्थिती आहे की विराट, एबी आणि रुट अव्वल तीन फलंदाज आहेत.’’ त्याचबरोबर, गिलख्रिस्टने श्रीलंकेचा माजी दिग्गज आॅफ स्पिनर मुथय्या मुरलीधरनला आतापर्यंतचा सर्वांत धोकादायक व आव्हानात्मक गोलंदाज म्हटले.
गिलख्रिस्ट म्हणाला, ‘‘मुरली खूप कठीण गोलंदाज होता. त्याची गोलंदाजी समजणे सोपे नव्हते. त्याचे चेंडू सरळ येतील की वळतील, याचा काहीच अंदाज बांधता येत नसे. तो शानदार गोलंदाज होता.’’ शिवाय, भारताला भारतीय भूमीवर नमवणे कधीही सोपे नाही, असेही गिलख्रिस्टने या वेळी सांगितले. तसेच, त्याने विराटसह भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार एमएस धोनी, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आठवणींना उजाळा दिला. (वृत्तसंस्था)