कोहली खेळाच्या तंत्राशी तडजोड करीत नाही : सचिन
By admin | Published: May 28, 2016 04:01 AM2016-05-28T04:01:17+5:302016-05-28T08:09:52+5:30
भारताचा सध्याचा नंबर वन फलंदाज विराट कोहलीच्या फलंदाजीतील रहस्य सरळ बॅटने खेळणे आणि खेळातील तंत्र पाळणे हेच असल्याचे मत माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याने व्यक्त
दुबई : भारताचा सध्याचा नंबर वन फलंदाज विराट कोहलीच्या फलंदाजीतील रहस्य सरळ बॅटने खेळणे आणि खेळातील तंत्र पाळणे हेच असल्याचे मत माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे. कोहली तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्वत:चे डावपेच आखत असल्याचे सचिनला वाटते.
गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, ‘विराट सरळ बॅटने खेळतो. त्याचे फटके शैलीदार असतात. विशेष प्रतिभेचा धनी असलेला हा खेळाडू स्वत:च्या खेळावर मोठी मेहनत घेतो. त्याच्यातील शिस्त आणि समर्पितवृत्ती अनुकरणीय आहे. तंत्राशी कुठलीही तडजोड न करता तो फलंदाजी करतो. मानसिकरीत्या कणखर असल्याने दडपणातही त्याची फलंदाजी बहरत असते.’
सचिनने आयपीएलचे कौतुक करीत आयपीएलचा स्तर उंचावल्याचे मत व्यक्त केले. सुरुवातीच्या सामन्यापासून अखेरच्या सामन्यापर्यंत या स्पर्धेत रोमांचकता टिकून असते. टी-२० मनोरंजक खेळ असून येथे प्रेक्षकांना चौकार आणि षटकार पहायला आवडतात; पण कसोटी क्रिकेट वेगळे आहे. हा प्रकार गोलंदाजांचे वर्चस्व गाजविणारा असावा. अन्य प्रकारात फलंदाजांना पूरक नियम असल्याने कसोटी क्रिकेट गोलंदाजांना झुकते माप देणारे असायला हवे. कसोटी क्रिकेट कुठल्याही खेळाडूसाठी कायम आव्हानात्मक राहील. कौशल्य, धैर्य, क्षमता आणि संयम यांची कसोटी क्रिकेटमध्ये परीक्षा होत असते. हा प्रकार आणखी रोमहर्षक व्हावा, यासाठी काही बदल करण्याचा विचार करण्यात यावा.’ (वृत्तसंस्था)