कर्णधार म्हणून कोहली प्रेरणादायी : कर्स्टन
By admin | Published: September 10, 2016 03:38 AM2016-09-10T03:38:29+5:302016-09-10T03:38:29+5:30
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वक्षमतेमुळे प्रभावित झाले
नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वक्षमतेमुळे प्रभावित झाले आहे. कर्णधार म्हणून त्याची कारकीर्द बहरत असल्याचे त्यांना अजिबात आश्चर्य वाटत नाही.
राजस्थान क्रिकेट अकादमीसोबत जुळलेले कर्स्टन म्हणाले,‘विराट भारतासाठी चांगला कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वक्षमता आहे. त्याची कामगिरीही उल्लेखनीय आहे. कसोटी संघाचे नेतृत्व करीत असल्यामुळे राष्ट्रीय संघाला लाभ झाला आहे. कर्णधार म्हणून तो प्रेरणादायी आहे आणि ही बाब संघासाठी हिताची आहे.’
कर्स्टन भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना महेंद्रसिंग धोनी तीन प्रकारात संघाचा कर्णधार होता, पण दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर असलेले कर्स्टन यांनी या दोघांमध्ये तुलना करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
कर्स्टन म्हणाले, ‘धोनी चांगला कर्णधार आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात धोनीसोबत काम करण्याचा आनंद घेतला. पण, आता मी भारतीय संघाला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळताना बघत नाही. त्यामुळे विराट व धोनी यांच्यामध्ये तुलना करणे योग्य नाही.’
आयसीसीने दोन स्तरीय कसोटी क्रिकेटचा प्रस्ताव मागे घेण्याबाबत विचारले असता कर्स्टन म्हणाले, ‘कसोटी क्रिकेटच्या हितासाठी मला दोन्ही मार्ग आवडले असते. जर अव्वल संघ सातत्याने एकमेकांविरुद्ध खेळले असते तर कसोटी क्रिकेटमधील चुरस संपली असती, असे मला वाटत नाही. पण जो सर्वोत्तम पर्याय आहे, त्याची निवड होणे योग्य आहे.’
दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय संघातील कोटा प्रणालीचे कर्स्टन यांनी समर्थन केले.
कर्स्टन म्हणाले, ‘मी राष्ट्रीय संघाच्या नीतीचे समर्थन करतो. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळते. एक विचार करता हा धाडसी निर्णय आहे.’ (वृत्तसंस्था)