कोहली - कुंबळे वादाने लक्ष वेधले
By admin | Published: June 1, 2017 12:32 AM2017-06-01T00:32:05+5:302017-06-01T00:32:05+5:30
सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानकपणे टीम इंडियावर वादाचे काळे ढग जमा झाले. गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये
- अयाझ मेमन -
सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानकपणे टीम इंडियावर वादाचे काळे ढग जमा झाले. गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यामध्ये दरी पडली असल्याचे वृत्त येत असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे वळले आहे. विशेष म्हणजे कोहली - कुंबळे यांनी एकत्रितपणे गतवर्ष गाजवले असल्याने या दोघांमध्ये वाद असल्याच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
कुंबळेची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर भारतीय संघाची विजयी मार्गावर वेगात आगेकूच सुरू झाली. यामुळे कुंबळे - कोहली ही भागीदारी भारतीय क्रिकेटसाठी सुवर्णक्षण ठरल्याचेही सिद्ध झाले. कसोटीमध्ये भारताने अग्रस्थान मिळवले. तसेच एकदिवसीय व टी-२० मध्येही भारताचे अग्रस्थान फार दूर नाही. कर्णधार कोहलीची महत्त्वाकांक्षा, त्याचे आक्रमक नेतृत्व यासह प्रशिक्षक कुंबळेचा अनुभव, त्याचे कौशल्य आणि निर्णयक्षमता हे भारतीय संघाच्या यशाचे सूत्र बनले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उंबरठ्यावर सर्व काही सुरळीत दिसत असताना या सर्व वृत्तानंतर भारतीय संघातील चैतन्य कमी होण्याची शक्यता आहे.
मुळात जेव्हा बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन पाठविण्याची मागणी केली, तेव्हाच काहीतरी गडबड असल्याची शंका आली. गेल्या १२ महिन्यांतील भारतीय संघाच्या कामगिरीचा आलेख बघितल्यास नक्कीच कुंबळेच्या कार्यकाळात वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र, यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे, बीसीसीआयने नियमाप्रमाणे प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागितले असणार. कारण, कुंबळेची निवड ही एक वर्षाच्या कार्यकाळापुरती झाली होती.
पण, त्याचवेळी दुसरी चर्चाही रंगत आहे. कुंबळेने स्वत:सह खेळाडूंच्या मानधनवाढीचीही मागणी केल्याने बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले, अशी चर्चाही होत आहे. मात्र, बीसीसीआयने आपण केवळ पारदर्शी कार्य करत असल्याचे स्पष्ट करतानाच कुंबळेच्या अर्जाला थेट प्रवेश मिळेल, असेही सांगितले.
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीला रवाना झाल्यानंतर बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवेदन मागितले. यामुळे, आॅस्टे्रलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर दोन महिन्यांतच बीसीसीआयने ही प्रक्रिया का केली नाही? असा प्रश्नही विचारला जात आहे. मात्र, या सर्व घडामोडींना कोहली - कुंबळे वादाचे कारण दिले जात आहे. जर का हे खरं असेल, तर बीसीसीआयने मागितलेल्या प्रशिक्षकपदाच्या अर्ज प्रक्रियेला नवे वळण लागेल.
या सव कथित वृत्तानुसार बीसीसीआयचे काही अधिकारी जाणून आहेत, की भारतीय संघाच्या डे्रसिंग रूममध्ये काहीच आलबेल नाही. त्यामुळेच त्यांनी प्रशिक्षकपदासाठी नवे अर्ज मागवले आहेत. दरम्यान, प्रशिक्षकपदाचा निर्णय नक्कीच बीसीसीआयवर अवलंबून आहे. सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या दिग्गजांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीकडे ही जबाबदारी असेल. त्याचवेळी एकीकडे भारताचा कर्णधार आणि दुसरीकडे भारताचा प्रशिक्षक या दोघांची निवड एक वर्षापूर्वीच करण्यात आली होती. तसेच, सल्लागार समितीच्या तिन्ही सदस्यांना ग्रेग चॅपेल यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात कशा प्रकारे संघातील वातावरण ढवळून निघाले होते, याची जाणीव असल्याने त्यांचा निर्णयही महत्त्वपूर्ण ठरेल.
मुळात कोण बरोबर आणि कोण चुकीचे, हे ठरवण्याइतपत ही समस्या फार मोठी नाही. जर हा वाद खरंच असेल, तर बोर्डाने दाखवलेला विश्वास नाहीसा होईल. या सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीसीसीआय, सीओए आणि सल्लागार समितीला हे सर्व
वाद मिटवून सुरळीत आणि परिणामकारक कार्य करण्याचा
प्रयत्न करावा लागेल. त्याचवेळी, कोहली व कुंबळे यांनी एकत्रितपणे चर्चा करून हे सर्व वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा.