कोहली शेर; धोनी ढेर!
By admin | Published: April 23, 2016 04:20 AM2016-04-23T04:20:17+5:302016-04-23T04:20:17+5:30
गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर फलंदांजांनीही हाराकिरी केल्यामुळे पुणे राइझिंगला आज पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बंगळरुूने त्यांचा १३ धावांनी पराभव केला
संतोष मोरबाळे, पुणे
गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर फलंदांजांनीही हाराकिरी केल्यामुळे पुणे राइझिंगला आज पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बंगळरुूने त्यांचा १३ धावांनी पराभव केला. पुणेला निर्धारित २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा करता आल्या
बंगळूरुने दिलेल्या १८६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पुण्याला सुरुवातीलाच धक्का बसला. डूप्लेसिसला दोन धावांवरच केन रिचर्डसनने तंबूत पाठवले. त्यानंतर आलेला पिटरसन दुखापतीमुळे तंबूत परतला. स्टिव्ह स्मिथला (४) कोहलीने धावबाद करत पुण्याला आणखी एक धक्का दिला. अजिंक्य रहाणे मात्र दुसऱ्या बाजूने किल्ला लढवत होता. धोनीने आपल्या नेहमीच्या आक्रमक फलंदाजीला आज मुरड घातली. सुरुवातीला त्याने फक्त स्ट्राईक रोटेट करण्यावरच भर दिला. रहाणेने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. आवश्यक धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तो परवेजच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला. त्याने ४५ चेंडूत ६० धावा केल्या.यानंतर सर्व जबाबदारी धोनीच्या खांद्यावर आली. मात्र धोनीलाही आज फटकेबाजी करणे अवघड जात होते.
हर्षल पटेलला उत्तुंग फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला व डिव्हिलर्सने त्याचा झेल घेतला. धोनीने ३८ चेंडूत ४१ धावा केल्या. त्यानंतर परेराने षटकार व चौकार मारत चांगली रंगत आणली. त्याने १३ चेंडूत तीन चौकार व तीन षटकाराच्या साह्याने ३४ धावा केल्या.वॉटसनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यांनतर आलेल्या आर. अश्विनला वॉटसनने शून्यावर बाद करत पुण्याच्या आशांना सुरुंग लावला. भाटीयाने २१ धावा केल्या.
आरसीबीचा ‘विराट’ धडाका
बंगळूरुचा कोहली व डिव्हिलर्स यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी करत धोनीच्या संघासमोर १८६ धावांचे आव्हान ठेवले. विराट कोहलीने ६३ चेंडूत ८० धावा केल्या. डिव्हिर्लसने ४६ चेंडूत ८३ धावा केल्या. धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लोकेश राहूल याला तिसरा परेराने सात धावांवर बाद करत चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर आलेल्या डिव्हिलर्स आणि कोहली यांनी पुण्याच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.डिव्हिर्लस् ७० धावांवर असताना आर. अश्विनच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला सोपा झेल अंकित शर्माला पकडता आला नाही. परेराने कोहलीला बाद केले. त्यानंतर लगेचच डिव्हिलर्सही बाद झाला. परेराच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल यावेळी मात्र अंकितने अचूक टिपला. डिव्हिर्लसने ८३ धावा केल्या. पुण्याकडून परेराने (३/३४) चांगला मारा केला.
>संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : २० षटकांत ३ बाद १८५़ धावा (विराट कोहली ८०, एबी डिव्हीलियर्स ८३; थिसारा परेरा ३/३४)़
राइजिंग पुणे सुपरजायंट्स : २० षटकांत ८ बाद १७२ धावा (अजिंक्य रहाणे ६०, महेंद्र सिंग धोनी ४१, परेरा ३४; रिचर्डसन ३/१३, वॉटसन २/३१)
> धोनी-विराटचा जयघोष
शिवाजी गोरे ल्ल पुणे
धोनी..धोनी...धोनी तर दुसरीकडे विराट...विराट....विराटच्या घोषणांनी एमसीएचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम दुमदुमले. दोन्ही कर्णधारांच्या नावासह अजिंक्य रहाणे, आर. अश्विन यांच्या नावांनी सुध्दा परिसर दणाणून सोडत क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला.
आयपीएलमध्ये पुणे संघाची दोन वर्षानंतर पुन्हा एंट्री झाली आणि या नव्या राइझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा कर्णधार कोण ? तर भारतीय वन-डे आणि टी-२० संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी. त्यात सामना कसोटी कर्णधार कोहलीच्या रॉयल्स चॅलेजर्स बॅँगलोर संघाविरुद्ध. पुण्यातील क्रिकेटप्रेमींना ही एक पर्वणीच झाली. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, अजिंक्य रहाणे, केविन पिटरसन, एबी डी व्हिलियर्स, शेन वॉटसन यांच्यासह महेंद्रसिंह धोनीचा हेलीकॅप्टर शॉट पाहण्याची संधी मिळणार होती.
>