कोहलीने अधिक जबाबदारीने खेळण्याची गरज : प्रसन्ना
By Admin | Published: March 31, 2015 12:01 AM2015-03-31T00:01:08+5:302015-03-31T00:01:08+5:30
विष्यात क्रिकेटच्या सर्वच स्वरूपामध्ये (कसोटी, वन-डे आणि टी-२०) विराट कोहलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात येण्याची शक्यता असून
नवी दिल्ली : भविष्यात क्रिकेटच्या सर्वच स्वरूपामध्ये (कसोटी, वन-डे आणि टी-२०) विराट कोहलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात येण्याची शक्यता असून, या फलंदाजाने संघाची अधिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे, असे मत महान फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी व्यक्त केले.
प्रसन्ना म्हणाले, ‘‘पुढील विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याने संघाची अधिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असून, खेळाडूंना एकसंध राखण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.’’
विश्वकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कोहलीच्या कामगिरीनंतर प्रसन्ना यांनी हे वक्तव्य केले.
प्रसन्ना म्हणाले, ‘‘आक्रमकता असणे आवश्यक आहे. पण तुम्ही प्रत्येक वेळी जशास तसे उत्तर देऊ शकत नाही. कोहली चांगला खेळाडू आहे, पण त्याने कधी कधी प्रतिस्पर्ध्यांचाही आदर करायला हवा. तुम्ही प्रत्येक वेळी गोलंदाजांना लक्ष्य करू शकत नाही.’’
कोहलीला विश्वकप स्पर्धेत विशेष छाप सोडता आली नाही. पण त्याने ५०.३८ च्या सरासरीने ८ सामन्यांत ३०५ धावा फटकावल्या. स्पर्धेत सलामीला पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत शतकी खेळी करणाऱ्या कोहलीला त्यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे चाहते निराश झाले. (वृत्तसंस्था)