'विराट' अपेक्षांचा भार पेलण्यासाठी कोहली सज्ज
By admin | Published: January 5, 2017 10:58 AM2017-01-05T10:58:57+5:302017-01-05T11:07:01+5:30
पत्रकारांना अनेकदा बातमी बनवल्यानंतर त्यामध्ये हेडीग शोधावी लागते. फार कमी वेळा एखाद्या नावामध्ये बातमीची हेडीग मिळते. उदहारणार्थ विराट कोहली.
Next
दीनानाथ परब/ ऑनलाइन लोकमत
पत्रकारांना अनेकदा बातमी बनवल्यानंतर त्यामध्ये हेडीग शोधावी लागते. फार कमी वेळा एखाद्या नावामध्ये बातमीची हेडीग मिळते. उदहारणार्थ विराट कोहली. ज्या सामन्यात विराटची बॅट फॉम्युर्ला वनच्या कारप्रमाणे चालते त्या सामन्याचे वृत्त लिहीताना बातमीचा मथळा ठरलेला असतो. भारताचा विराट विजय, भारताचा विराट शो. माणस आयुष्यात फार कमी वेळा त्यांच्या मूळ नावाच्या अर्थाला साजेशी कामगिरी करतात. पण विराट कोहली मात्र याला अपवाद आहे.
अंडर 19 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून विराटने कधी मागे वळून बघितलेले नाही. प्रत्येक मालिकेमध्ये विराटने त्याच्याबद्दलच्या अपेक्षा उंचावत नेल्या आणि पूर्ण केल्या आहेत. आता महेंद्रसिंह धोनीने वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर भारताचा पुढचा वनडे कर्णधार म्हणून विराटकडे पाहिले जात आहे. कसोटी संघाची धुरा यशस्वीपणे संभाळणा-या विराटकडून वनडेमध्येही तशाच नेतृत्वाची कोटयावधी क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे.
कर्णधारपदाची जबाबदारी आल्यानंतर काही खेळाडूंचा खेळ अधिक बहरतो तर काहीजण त्या ओझ्याखाली पार दबून जातात. विराट हा पहिल्या प्रकारच्या खेळाडूंमध्ये मोडतो. जबाबदारी आल्यानंतर विराट अधिक तेजाने तळपतो. कसोटी कर्णधारपदाची धुरा संभाळल्यानंतर हे दिसले आहे. विराटने स्वत: शतकी खेळया साकारुन सहका-यांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा निर्माण केली. विराटच्या सध्याच्या फॉर्मवरुन त्याची सचिन तेंडुलकरबरोबर तुलना होत आहे. स्वत: सचिननेही भविष्यात आपले विक्रम विराट मोडू शकतो असे म्हटले आहे.
1995 ते 2001 पर्यंत भारतीय संघात 11 खेळाडू असायचे पण अपेक्षा फक्त एकटया सचिनकडून असायच्या. सचिन खेळला तरच जिंकू अशी त्यावेळी अनेकांची भावना असायची. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही पण विराट शेवटपर्यंत टिकला तर विजय पक्का असा अनेकांना ठाम विश्वास असतो. भविष्यात वनडे कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर विराटला धोनीच्या नेतृत्वाच्या तुलनेशी सामना करावा लागेल. अडचणीच्या परिस्थितीत शांतता, संयम राखून धोनीने योग्य निर्णय घेतल्यामुळे भारताला अनेक सामने जिंकता आले.
त्यामुळे धोनीला कॅप्टन कूल म्हटले जाते तर, विराट बिलकुल याउलट आहे. त्याचा तापट स्वभाव लगेच लक्षात येतो. मैदानावर किंवा मैदानाबाहेरच्या वादांमध्ये अनेकदा हे दिसले आहे. विराटचा रागाचा पारा लगेच चढत असला तरी मैदानावरील विराटच्या कृतीमध्ये जिंकण्याची उर्मी, जिद्द दिसते. हाच गुण त्याच्या चाहत्यांना जास्त भावतो. डिवचल्यानंतर विराटची बॅट अधिक त्वेषाने चालते हे वेळोवेळी दिसले आहे. भारतीय खेळपट्टयांवरच नव्हे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेच्या आग ओकणा-या खेळपट्टयांवरही विराटने खो-याने धावा केल्या आहेत.
2012 मध्ये ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारतासमोर 40 षटकात 321 धावा फटकावण्याचे कठिण आव्हान होते. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 320 धावा केल्या होत्या. पहिल्या चेंडूपासून भारताला फटकेबाजी करावी लागणार होती. पहिले तीन फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराटने अवघ्या 86 चेंडूत नाबाद 133 धावा तडकावल्या. त्यामुळे भारताने 36.4 षटकातच हे अशक्यप्राय आव्हान पार केले. त्यामुळे अशक्य हा शब्दच विराटच्या शब्दकोशात नसावा.
जबाबदारी ओळखून विराटनेही त्याच्यामध्ये अनेक बदल केले आहेत. कसोटी, टी-20 आणि वनडे अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळत रहाण्यासाठी फिटनेस आवश्यक आहे. त्यामुळे नेटमधल्या सरावा इतकाच विराट फिटनेसवरही लक्ष देतो. तळलेल्या अन्नपदार्थांचे सेवन टाळतो. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज आहेत. पण त्यातही लक्षात राहणारी दोन नावे म्हणजे सुनिल गावस्कर आणि सचिन तेंडुलकर. 1987 साली सुनिल गावस्कर निवृत्त झाले त्यावेळी त्यांच्यानंतर कोण ? असा प्रश्न पडला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकरच्या रुपाने त्याचे उत्तर मिळाले. 2013 मध्ये सचिनने निवृत्ती स्वीकारली त्यानंतर कोण ? या प्रश्नाचे उत्तर कदाचित विराट कोहली असावे.