सोशल मीडियावर कोहलीच धोनीपेक्षा सरस
By admin | Published: April 4, 2016 01:01 PM2016-04-04T13:01:18+5:302016-04-04T13:05:08+5:30
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आता सोशल मीडियावरही धोनीपेक्षा सरस ठरला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - मैदानावरील उत्पादन जाहीरातीमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकल्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आता सोशल मीडियावरही धोनीपेक्षा सरस ठरला आहे. ट्विटर, फेसबूक आणि इन्स्ट्राग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कोहलीची सर्वात जास्त चर्चा होत असून तो ट्रेंडिंगमध्ये असल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. मार्च महिन्यात कोहलीबाबत १२ लाखांच्या आसपास संभाषणे झाली तर धोनीबाबा हाच आकडा ७ लाखांच्या आसपास असल्याचे ऑटम वर्ल्डवाईड या सोशल मीडिया ट्रॅकर कंपनीने म्हटल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
' भारतात यापूर्वी संभाषणाचा व्हॉल्यूम हा १.५ ते ४ लाखांच्या आसपास असायचा. मात्र पहिल्यांदाच हा आकडा वाढून १० ते १२ लाखांच्या घरात गेल्याचे पहायला मिळत असून कोहलीने निर्विवादपमे पुढे झेप घेतली आहे' असे ऑटम वर्ल्डवाईडच्या सीईओ अनुषा शेट्टी यांचे म्हणणे आहेय
'सध्याच्या सोशल वर्ल्डच्या युगात प्रत्येक विषयावर चर्चा केली जाते. एका विषयातून निघालेल्या दुस-या विषयावर सुरू होणारी चर्चा वाढतच जाते. आणि मॅचमधील परफॉर्मन्स आणि व्यक्तिगत आयुष्य यावर होणा-या चर्चेमुळे हा व्हॉल्यूम वाढतो.' २७ वर्षीय कोहलीने आयसीसी टी-२० वर्ल्ड टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत.
जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ पर्यंत धोनी व कोहली यांच्याबद्दल होणारी संभाषण वा चर्चेचा व्हॉल्यूम एकाच पातळीवर होता, मात्र जानेवारी २०१६ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील टीमने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर धोनीने कोहलीला मागे टाकले होते, अशी माहिती ऑटम वर्ल्डवाईडतर्फे समोर आली आहे.
दरम्यान धोनी व कोहली हे दोघेही पेप्सिकोचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, मात्र या कंपनीच्या समर कॅम्पेनच्या जाहिरातींमध्ये आत्तापर्यंत फक्त कोहलीच्याच जाहिराती दाखवण्यात आल्या आहेत. मात्र या कॅम्पेनमध्ये धोनीच्या जाहिराती कधी दाखवण्यात येतील, याचा अद्याप निर्णय झालेला नाही.
ट्विटरवर कोहलीचे १ कोटींहून अधिक फॉलोअर्स असून महेंद्रसिंग धोनीचे ५२ लाख ७७ हजार ६२१ फॉलोअर्स आहेत. तसेच मैदानावरील उत्पादन जाहीरातींमध्येही विराटने धोनीला मागे टाकले आहे. धोनी बॅटवर स्टीकर लावण्याचे सहा कोटी आकारतो तर विराटच्या बॅटवरील एमआरएफच्या स्टीकरसाठी त्याला आठ कोटी रुपये मिळतात. त्याशिवाय सरावाच्यावेळी पोषाख आणि बूटांची जाहीरात करण्याचे विराटला आणखी दोन कोटी रुपये मिळतात.