कोहलीमुळेच सामनावीर ठरलो : मोहम्मद शमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:11 AM2019-01-24T04:11:30+5:302019-01-24T04:11:56+5:30
भारतीय संघाने न्यूझीलंडला पहिल्या वन डेत आठ गडी राखून पराभूत केले. सामन्यात मोहम्मद शमी याने गोलंदाजीत सुरुवातीच्या षटकात चमक दाखवून न्यूझीलंडच्या सलामीवीरांना चक्क माघारी फिरविले.
नेपियर : भारतीय संघाने न्यूझीलंडला पहिल्या वन डेत आठ गडी राखून पराभूत केले. सामन्यात मोहम्मद शमी याने गोलंदाजीत सुरुवातीच्या षटकात चमक दाखवून न्यूझीलंडच्या सलामीवीरांना चक्क माघारी फिरविले. मार्टिन गुप्तिल आणि कोलिन मुन्रो यांची शमीने दांडी गुल केली. शमीने सहा षटकात केवळ १९ धावा देत तीन गडी टिपताच सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. हे यश आपल्याला कर्णधार विराट कोहलीमुळे मिळाल्याची प्रतिक्रिया शमीने सामन्यानंतर व्यक्त केली.
तो म्हणाला,‘ मी अनेक महिन्यानंतर पुनरागमन केले. दोन वर्षात दुखापतीने आणि इतर वादांमुळे थोडा त्रस्त होतो. दुखापतींमुळे खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सपोर्ट स्टाफनेही खूप सहकार्य केले. विशेष असे की विराटने सतत पुनरागमनासाठी प्रोत्साहन दिले. या बळावरच मी पुनरागमन करू शकलो.’
आम्ही जे यश मिळवले ते सांघिक कामगिरीच्या जोरावरच. एकमेकांना सहकार्य केल्याने विजय मिळवणे शक्य झाले. ज्या योजना आखल्या होत्या त्यावर अमल केला. एखादी योजना फसली की आमच्याकडे दुसरा पर्याय तयार असतो. ’
न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलियातील मैदानांमध्ये फरक असल्याचे सांगून शमी पुढे म्हणाला,‘ आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट््या न्यूझीलंडसारख्याच होत्या, पण तेथील मैदाने मोठी होती आणि वातावरण उष्ण होते. येथे मात्र मैदाने लहान आहेत आणि वातावरण उबदार आहे. त्यामुळे वातावरणाशी एकरुप होत खेळणे भाग पडते.’