कोहलीकडून इयान हिलीची 'पोल खोल', युट्यूब सर्च करा सर्व कळेल
By admin | Published: March 8, 2017 04:27 PM2017-03-08T16:27:30+5:302017-03-08T16:27:30+5:30
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावर शेरेबाजी करण्यासाठी ओळखलं जातं. मात्र, जेव्हा त्यांच्यासोबत कोणी असा व्यवहार करतं तेव्हा ते त्याला खेळभावनेच्या विरोधात ठरवतात.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 8 - ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावर शेरेबाजी करण्यासाठी ओळखलं जातं. मात्र, जेव्हा त्यांच्यासोबत कोणी असा व्यवहार करतं तेव्हा ते त्याला खेळभावनेच्या विरोधात ठरवतात. बंगळुरू कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यावरही अशीच घटना झाली. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक इयान हिली यांनी विराट कोहलीच्या आक्रमकतेवर टीका केली होती. विराट कोहलीकडून सातत्याने होत असलेल्या स्लेजिंगमुळे मी त्याच्याप्रति असलेला सन्मान गमावला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर विराटने युट्युबवर असलेल्या एका व्हिडीओचं उदाहरण देत इयान हिलीला प्रत्युत्तर दिलं.
एका व्यक्तीच्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही, माझ्यासाठी भारतीय चाहते महत्वाचे आहेत. जो व्यक्ती स्वतःच वादात राहिलाय त्याचं मला महत्व वाटत नाही असं कोहली म्हणाला. सर्वांनी युट्यूबवर असलेला 1997 साली सेंच्यूरिअनमध्ये झालेल्या कसोटीचा व्हिडीओ बघावा असं मला वाटतं त्यामधून सर्व स्पष्ट होतं असं कोहली म्हणाला.
काय होती 1997 च्या सेंच्यूरिअन कसोटीतील घटना-
युट्यूबवर असलेल्या एका व्हिडीओकडे कोहलीने लक्ष वेधलं. 1997 मध्ये सेंच्यूरिअन कसोटीत लेग स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवर अंपायरने हिली यांना बाद ठरवलं होतं. त्यावर हिलीने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मैदानाबाहेर येताना त्याने आपली बॅट देखील फेकून दिली होती. त्यानंतर हिलीवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.