कोहलीला विनाकारण टार्गेट केलं जातंय
By admin | Published: June 26, 2017 01:21 AM2017-06-26T01:21:40+5:302017-06-26T01:21:40+5:30
अनिल कुंबळे यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे मीडिया व सोशल मीडियामध्ये लोकांच्या
हमीरपूर : अनिल कुंबळे यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे मीडिया व सोशल मीडियामध्ये लोकांच्या रोषाला सामोरे जात असलेल्या कर्णधार विराट कोहलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पाठराखण केली. कोहलीला विनाकारण टार्गेट करण्यात येत असून, भारतीय क्रिकेट संघाचे भविष्य कोहलीच्या हाती सुरक्षित असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.
कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर टिष्ट्वट केले होते की, कर्णधाराचा माझ्या शैलीवर आणि मी प्रशिक्षकपदी कायम राहण्यावर आक्षेप होता.
हिमाचल प्रदेश आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष ठाकूर म्हणाले, ‘विराटला विनाकारण टार्गेट करण्यात येत आहे. माझ्या मते ही चर्चा आता थांबायला हवी. भारतीय क्रिकेटला आगामी १० वर्षे शिखरावर असल्याचे बघायचे असेल तर कोहलीमध्ये ती क्षमता आहे. असे प्रथमच घडलेले नाही. यापूर्वीही कर्णधार व माजी कर्णधारांना टार्गेट करण्यात आलेले आहे.’
कुंबळे यांची गेल्या वर्षी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्षपद ठाकूर यांच्याकडे होते. बीसीसीआयने त्यावेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण सदस्य असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) शिफारशीनंतर कुंबळे यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती.
आम्ही अशा बाबी बाहेर येऊ दिल्या नाहीत, असे सांगत ठाकूर यांनी बीसीसीआयच्या सध्याच्या पदाधिकाऱ्यांवर नेम साधला. कुंबळे यांच्यासोबत करार करण्यात आला त्यावेळी कुणी त्यावर आक्षेप नोंदवला नाही.
ज्यावेळी आम्ही पदावर होतो त्यावेळी कुणी या दोघांमध्ये वाद असल्याचे म्हटले नव्हते. आज ज्या व्यक्ती बोर्डाचा कारभार बघत आहेत त्यांना असे का घडले, हा प्रश्न विचारायला हवा, असेही ठाकूर म्हणाले. (वृत्तसंस्था)