कोहलीला विक्रमवीर होण्याची संधी!
By admin | Published: September 21, 2016 08:16 PM2016-09-21T20:16:59+5:302016-09-21T20:16:59+5:30
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका जिंकल्यास देशातील दिग्गज कर्णधारांना मागे टाकू शकेल.
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. २१ : शानदार फॉर्ममध्ये असलेला आणि स्वत:च्या नेतृत्वात सलग तीन मालिका जिंकणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका जिंकल्यास देशातील दिग्गज कर्णधारांना मागे टाकू शकेल.
वैयक्तिकदृष्टया विराटसाठी ही मालिका अतिशय मोलाची आहे. मागच्या तिन्ही मालिकांवर वर्चस्व गाजविणाऱ्या विराटने लंकेला २२ वर्षांनंतर २-१ ने, द. आफ्रिकेला ३-० ने आणि नंतर विंडीजला २-० ने पराभूत केले होते.
आतापर्यंत १४ कसोटीत नेतृत्व करणाऱ्या विराटने सात सामने जिंकले. दोन सामने हरले तर पाच सामने अनिर्णीत राहिले. या मालिकेनंतर विराट विजय हजारे(१४ कसोटी), लाला अमरनाथ(१५) आणि अजित वाडेकर(१६) यांना मागे टाकून सर्वाधिक कसोटीत नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत दहाव्या स्थानावर दाखल होणार आहे.
सर्वाधिक कसोटी विजय मिळविणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराट सध्या सातव्या स्थानावर आहे. या मालिकेत क्लीन स्वीप झाल्यास राहुल द्रविड(८विजय), नवाब पतौडी(९ विजय) आणि सुनील गावस्कर(९ विजय) यांना मागे टाकून
विराट चौथ्या स्थानावर येईल.