कोहलीची फलंदाजी विश्व दर्जाची

By admin | Published: May 8, 2016 11:08 PM2016-05-08T23:08:09+5:302016-05-09T00:38:55+5:30

जर कुणी टी-२० क्रिकेट पूर्णपणे आक्रमक फलंदाजी करणा-या फलंदाजांचा खेळ, असे मत व्यक्त करीत असेल तर त्याने नक्की विराट कोहलीला खेळताना बघायला पाहिजे.

Kohli's world-class batting | कोहलीची फलंदाजी विश्व दर्जाची

कोहलीची फलंदाजी विश्व दर्जाची

Next

कॉलम एबी डिव्हिलियर्स
जर कुणी टी-२० क्रिकेट पूर्णपणे आक्रमक फलंदाजी करणार्‍या फलंदाजांचा खेळ, असे मत व्यक्त करीत असेल तर त्याने नक्की विराट कोहलीला खेळताना बघायला पाहिजे. आरसीबीचा कर्णधार जबरदस्त फार्मात आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात त्याने आतापर्यंत ५४१ धावा फटकावल्या आहेत. त्यात दोन शतकी खेळींचा समावेश आहे. ९०.१६ ची त्याची सरासरी विशेष आहे. त्याने हे सर्व काही परंपरागत क्रिकेटच्या फटक्यांच्या माध्यमातून साध्य केले आहे, हे विशेष. अखेरच्या षटकांमध्ये तो तोलून-मापून जोखीम पत्करतो. मी गेल्या आठवड्यांमध्ये त्याची फलंदाजी जवळून बघितली आहे. बरेचदा नॉन-स्ट्रायकर एन्डला उभे राहून त्याच्या फलंदाजीचा आनंद घेतला आहे. मी त्याच्या आत्मविश्वासाचा प्रशंसक आहे. गॅपमध्ये फटके खेळण्याची त्याची योग्यता कमालीची आहे. तो आपला डाव चांगल्या पद्धतीने साकारतो. बेंगळुरूमध्ये त्याने पुणेविरुद्ध केलेली खेळी मास्टरक्लास होती. डावाच्या सुरुवातीला तो चांगल्या चेंडूचा आदर करण्यास कचरत नाही आणि आवश्यक धावगतीचे दडपणही त्याच्यावर नसते. गरज असेल तेव्हा चौकार-षटकारांच्या माध्यमातून लक्ष्य गाठता येते, याची त्याला कल्पना आहे. शनिवारी त्याने तेच केले.
विराट आणि राहुल यांनी सुरुवातीच्या तीन षटकांमध्ये केवळ १० धावा केल्या; पण त्यामुळे त्यांच्यावर दडपण आले नाही. चौथ्या षटकात राहुलने दुसर्‍या चेंडूवर षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर विराटने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला सीमारेषा दाखविली. आत्मविश्वास उंचावलेल्या फलंदाजाच्या बॅटमधून निघालेला हा योजनाबद्ध फटका होता. सहाव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या परेराच्या गोलंदाजीवर त्याने उंचावरून फटका मारत सहा धावा वसूल केल्या. आठव्या षटकात भाटियाच्या गोलंदाजीवर त्याने मारलेला स्ट्रेट षटकार शानदार होता. हे दोन्ही फटके कॉपीबुक क्रिकेटप्रमाणे होते. नवव्या षटकात त्याने दोन चौकार ठोकले. त्यातील एक कव्हरमधून तर दुसरा मिडविकेटवर लगावलेला होता. त्यानंतर त्याने ११ व्या षटकात भाटियाच्या गोलंदाजीवर दोन चौकार ठोकले. शेन वॉटसन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत असताना विराट एकेरी-दुहेरी धावा घेण्यावर लक्ष केंद्रित करीत होता. १८व्या षटकात कोहलीने दोन षटकार व एक चौकार ठोकत १८ धावा वसूल केल्या. १९ व्या षटकात त्याने दोन षटकार ठोकल्यानंतर अखेरच्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर विजयी चौकार ठोकला. त्याने ५८ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १०८ धावांची खेळी केली. विराट कोहलीची फलंदाजी विश्व दर्जाची आहे, यात दुमत नाही. (टीसीएम)

Web Title: Kohli's world-class batting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.