कोहलीचे विश्वविक्रमी द्विशतक

By admin | Published: February 11, 2017 12:34 AM2017-02-11T00:34:55+5:302017-02-11T00:34:55+5:30

कर्णधार विराट कोहलीने सलग चौथ्या कसोटी मालिकेत चौथे द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशच्या कमकुवत

Kohli's world record double ton | कोहलीचे विश्वविक्रमी द्विशतक

कोहलीचे विश्वविक्रमी द्विशतक

Next

हैदराबाद : कर्णधार विराट कोहलीने सलग चौथ्या कसोटी मालिकेत चौथे द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशच्या कमकुवत गोलंदाजीविरुद्ध एकमेव कोसटी सामन्यात दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ६ बाद ६८७ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात खेळताना दुसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने १ गडी गमावित ४१ धावा केल्या होत्या. उमेश यादवने सलामीवीर सौम्या सरकारला माघारी परतवले.
कोहलीने २०४ धावांची खेळी करीत महान सर डॉन ब्रॅडमन व राहुल द्रविड यांचा विक्रम मोडला. त्यांनी सलग तीन मालिकांमध्ये तीन द्विशतके झळकावली होती. कोहलीने यापूर्वी वेस्ट इंडिज (२००), न्यूझीलंड (२११) व इंग्लंड (२३५) यांच्याविरुद्ध द्विशतके झळकावली होती.
भारताने ६ बाद ६८७ धावांची मारलेली मजल विक्रमी ठरली आहे. कारण यापूर्वी कुठल्याही संघाला सलग तीन कसोटी सामन्यांत ६०० धावांच्या पुढे मजल मारता आलेली नाही. यापूर्वी भारताने इंग्लंडविरुद्ध मुंबई व चेन्नई कसोटी सामन्यात ६०० धावांची वेस ओलांडण्याचा पराक्रम केला आहे.
संघात पुनरागमन करीत असलेला यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाने त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरविला. साहा याने १५५ चेंडूंना सामोरे जात नाबाद १०६ धावांची खेळी केली. हे त्याचे दुसरे कसोटी शतक ठरले. रिद्धिमान व रवींद्र जडेजा (नाबाद ६०) यांनी सातव्या विकेटसाठी १८८ धावांची अभेद्य भागीदारी केली. अजिंक्य रहाणेने १३३ चेंडूंना सामोरे जाताना ८२ धावा फटकावल्या. रहाणेने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खराब फॉर्म व दुखापतीतून सावरला असल्याचे सिद्ध केले.
खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्यास सुरुवात झाली असल्यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांना सामना वाचविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, पण भारतीय फिरकीपटू जडेजा व अश्विनविरुद्ध त्यांना कितपत यश मिळते, याबाबत साशंकता आहे.
कोहलीने आजच्या द्विशतकी खेळीदरम्यान अनेक विक्रम नोंदवले. त्यात स्थानिक मोसमात सर्वाधिक कसोटी धावा फटकावण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे. त्याने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात कोहलीचे वर्चस्व राहिले. त्याने पाच तासांपेक्षा कमी वेळेत द्विशतकी खेळी केली. त्याने २३९ चेंडूंना सामोरे जाताना २४ चौकार लगावले. कोहलीने उपाहारानंतर द्विशतक पूर्ण केले. ताईजुल इस्लामच्या गोलंदाजीवर कटचा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो पायचित झाला. कोहली - रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी २२२ धावांची भागीदारी केली. रहाणेचे शतक हुकले. मेहदी हसनने फिरकीपटू ताईजुल इस्लामच्या गोलंदाजीवर त्याचा अफलातून झेल घेतला. रहाणेने १३३ चेंडूत ११ चौकार लगावले.
भारताने पहिल्या सत्रात १२१, तर दुसऱ्या सत्रात १४३ धावा फटकावल्या. त्यानंतर साहा याने आक्रमक फलंदाजी करीत १५५ चेंडूंमध्ये सहा चौकार व दोन षटकार लगावले. त्याने बांगलादेशचा सर्वांत यशस्वी गोलंदाज ताईजुलच्या (३-१५६) गोलंदाजीवर षटकार ठोकत शतक पूर्ण केले. रिद्धिमान व जडेजा यांनी २५.३ षटकांत ११८ धावांची भागीदारी केली. जडेजाने ७८ चेंडूत ४ चौकार व २ षटकारासह ६० धावा केल्या. 

नंबर गेम
सर्वाधिक ५ द्विशतक झळकावणारा कर्णधार फलंदाज वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा याच्यानंतर कोहलीचा क्रमांक. त्याचवेळी, ब्रॅडमन, मायकल क्लार्क आणि ग्रॅमी स्मिथ यांनीही कर्णधार म्हणून कोहलीप्रमाणे प्रत्येकी ४ द्विशतक ठोकले आहेत.

सलग तिसऱ्या कसोटीमध्ये किमान एका भारतीय फलंदाजाने २०० हून अधिक धावांची खेळी केली आहे. मुंबईत इंग्लंडविरुध्द कोहली २३५ धावा काढल्यानंतर चेन्नई कसोटीत करुण नायरने ३०३ धावा काढल्या होत्या. यानंतर, आता हैदराबादला पुन्हा एकदा कोहलीने द्विशतकी खेळी केली.

२०१३ नंतर तिसऱ्यांदा द्विशतकी भागीदारी करणारी कोहली - अजिंक्य रहाणे पहिली जोडी ठरली. त्यांनी या सर्व भागीदाऱ्या चौथ्या विकेटसाठी केल्या असून कोहली - रहाणे यांनी सचिन तेंडुलकर - सौरभ गांगुली यांच्या चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक द्विशतकी भागीदारी विक्रमाची बरोबरी केली.

भारताकडून सर्वाधिक द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली संयुक्तपणे चौथ्या स्थानी. सचिन तेंडुलकर व विरेंद्र सेहवाग यांनी सर्वाधिक प्रत्येकी ६ द्विशतक झळकावले आहेत. यानंतर द्रविड (५) आणि सुनिल गावसकर (४) यांचा क्रमांक. या फलंदाजांव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाने दोन किंवा त्याहून अधिक द्विशतक झळकावलेले नाही.

सलग तीन डावांमध्ये ६०० हून अधिक धावा उभारणारा भारतीय संघ क्रिकेटविश्वात पहिला संघ ठरला. याआधी झालेल्या इंग्लंडविरुध्दच्या मालिकेत भारताने मुंबईत ६३१, तर चेन्नईमध्ये ७५९ धावांचा डोंगर उभारला होता.

बांगलादेशविरुद्ध द्विशतक ठोकणारा कोहली तिसरा कर्णधार ठरला. याआधी न्यूझीलंडचा स्टिफन फ्लेमिंग (२०२) आणि दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ (२३२) यांनी कर्णधार म्हणून बांगलादेशला द्विशतकी तडाखा दिला आहे.

घरच्या मैदानावर एकाच मोसमात सर्वाधिक धावा काढण्याचा विरेंद्र सेहवागचा विक्रम कोहलीने मोडला. सेहवागने २००४-०५ मध्ये ११०५ धावा काढल्या होत्या, तर कोहलीने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ११६८ धावा काढल्या आहेत.


धावफलक
भारत पहिला डाव : लोकेश राहुल त्रि. गो. तास्किन अहमद ०२, मुरली विजय झे. ताईजुल इस्लाम १०८, चेतेश्वर पुजारा झे. मुशफिकर रहीम गो. मिराज ८३, विराट कोहली पायचित गो, ताईजुल इस्लाम २०४, अजिंक्य रहाणे झे. मिराज गो. ताईजुल इस्लाम ८२, रिद्धिमान साहा नाबाद १०६, आर. अश्विन झे. सौम्या सरकार गो. मिराज ३४, रवींद्र जडेजा नाबाद ६०. अवांतर (८). एकूण १६६ षटकांत ६ बाद ६८७ (डाव घोषित). बाद क्रम : १-२, २-१८०, ३-२३४, ४-४५६, ५-४९५, ६-५६९.

गोलंदाजी : तास्किन अहमद २५-२-१२७-१, कामरुल इस्लाम रब्बी १९-१-१००-०, सौम्या सरकार १-०-४-०, मेहदी हसन मिराज ४२-०-१६५-२, साकिब अल-हसन २४-४-१०४-०, ताईजुल इस्लाम ४७-६-१५६-३, सब्बीर रहमान ३-०-१०-०, महमुदुल्लाह ५-०-१६-०.

बांगलादेश पहिला डाव : तमीम इक्बाल खेळत आहे २४, सौम्य सरकार झे. साहा गो. उमेश यादव १५, मोमिनुल हक खेळत आहे ०१. अवांतर (०१). एकूण १४ षटकांत १ बाद ४१. बाद क्रम : १-३८.

गोलंदाजी : भुवनेश्वर ५-२-७-०, ईशांत ५-०-३०-०, अश्विन २-१-१-०, उमेश यादव २-१-२-१.

Web Title: Kohli's world record double ton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.