कोल्हापूरच्या अनिकेतची सव्वादोन कोटींची भरारी; हैदराबादकडून करारबद्ध, महाराष्ट्रातील पहिला खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 08:28 AM2021-07-22T08:28:44+5:302021-07-22T08:30:20+5:30

हैदराबाद एफसी संघाकडून तीन वर्षांकरिता खेळण्यासाठी तब्बल २ कोटी २५ लाखांच्या करारावर अनिकेतने स्वाक्षरी केली. 

kolhapur Aniket contracted from Hyderabad who first player in Maharashtra | कोल्हापूरच्या अनिकेतची सव्वादोन कोटींची भरारी; हैदराबादकडून करारबद्ध, महाराष्ट्रातील पहिला खेळाडू

कोल्हापूरच्या अनिकेतची सव्वादोन कोटींची भरारी; हैदराबादकडून करारबद्ध, महाराष्ट्रातील पहिला खेळाडू

googlenewsNext

सचिन भोसले

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : भारतीय फुटबॉलचे आयडॉल सुनील छेत्री, बायचुंग भुतिया, ग्रे हुपर, अदम लिफोंड्रे, इद्रीसा सियाल, इस्मार अशा दिग्गज फुटबॉलपटूंनी अमुक एका संघासाठी कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजवर करारबद्ध झाल्याचे आपण वाचले आहे. याच रांगेत आता कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधवही जाऊन बसला आहे. बुधवारी हैदराबाद एफसी संघाकडून तीन वर्षांकरिता खेळण्यासाठी तब्बल २ कोटी २५ लाखांच्या करारावर त्याने स्वाक्षरी केली. 

इतक्या मोठ्या रकमेचा करारबद्ध होणारा तो पहिला महाराष्ट्रीयन फुटबॉलपटू ठरला आहे. अनिकेतने फुटबॉलचे सुरुवातीचे धडे क्रीडा प्रबोधिनीमधून गिरवले. त्याच्या खेळाची चुणूक पाहून प्रथम पुणे एफसी अकादमीत तीन वर्षासाठी निवड झाली. अनेक वयोगटात खेळल्यानंतर २०१५ साली त्याची भारतात होणाऱ्या १७ वर्षाखालील फिफा युवा विश्वचषक स्पर्धेसाठीच्या शिबिरासाठी निवड झाली. त्यातून त्याची भारतीय युवा संघात निवड झाली. तो भारतीय संघाचा मुख्य आधार बनला होता. 

युवा विश्वचषकानंतर त्याची वर्णी भारतीय फुटबॉल संघाच्या ॲरोज कडून झाली. तेथील  कामगिरीवर त्याची जमशेदपूर एफसी संघात निवड झाली. आयलीग आणि त्यानंतर आयएसएलमध्ये प्र‌‌वेश केला. त्याने त्या हंगामात २७ सामन्यांत गोल करून चुणूक दाखविली. यादरम्यान ब्लॅकबर्न रोव्हर्समध्ये त्याला तीन महिन्याचे व्यावसायिक प्रशिक्षणही लाभले. त्यात त्याच्या कौशल्याचा गौरव करण्यात आला. या सर्व कामगिरीची दखल घेत हैदराबाद एफसी संघाने त्याला बुधवारी तीन वर्षाकरिता करारबद्ध केले.

मी हैदराबाद एफसीकडून खेळण्यासाठी अधीर झालो आहे. या संघाकडून करारबद्ध होताना मला आनंद होत आहे. - अनिकेत जाधव, युवा फुटबॉलपटू

एचएफसी संघातील अनिकेतच्या समावेशामुळे  संघातील स्पर्धा वाढेल. त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. - मानोलो मार्केझ, मुख्य प्रशिक्षक, हैदराबाद एफसी
 

Web Title: kolhapur Aniket contracted from Hyderabad who first player in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.