कोल्हापूरच्या संमेदने मारली बाजी
By admin | Published: December 30, 2014 02:21 AM2014-12-30T02:21:17+5:302014-12-30T02:21:17+5:30
विजेतेपदासाठी बरोबरी देखील पुरेशी असणाऱ्या कोल्हापूरच्या संमेद शेटे याने अपेक्षेप्रमाणे साक्षी चितलांगेविरुध्दचा डाव बरोबरीत सोडवत चेस किंग फिडे मानांकन बुध्दिबळ स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले.
मुंबई : विजेतेपदासाठी बरोबरी देखील पुरेशी असणाऱ्या कोल्हापूरच्या संमेद शेटे याने अपेक्षेप्रमाणे साक्षी चितलांगेविरुध्दचा डाव बरोबरीत सोडवत चेस किंग फिडे मानांकन बुध्दिबळ स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले. त्याचवेळी स्पर्धेत सर्वाधिक फिडे मानांकन असलेल्या तामिळानाडूच्या हरिकृष्णनला द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.
अस्तित्व संस्कार प्रबोधिनीच्या वतीने करी रोड येथील ना. म. जोशी मार्ग शाळेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत सुरुवातीच्या चार डावांमध्ये विजयी घोडदौड करताना हरिकृष्णनने आघाडी मिळवली होती. मात्र पाचव्या डावात मुंबईकर विश्वा विरुध्द अनपेक्षितपणे बरोबरी साधावी लागल्याने हरिकृष्णन मागे पडला. नेमक्या याच संधीच फायदा उचलत संमेदने स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर अखेरपर्यंत आघाडी कायम राखली. त्याचवेळी साक्षी चितलांगेने अखेरच्या डावात संमेद विरुध्द विजय मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र जरी ती हा सामना जिंकली असती तरी तीला विजेतेपदाचा मान मिळणार नव्हता आणि हरली असती तर ती थेट पाचव्या क्रमांकावर फेकली गेली असती. त्यामुळे तीनेही संमेद विरुध्द बरोबरी मान्य केली.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूला बलाढ्य हरिकृष्णने आपल्या अखेरच्या डावात अथर्व तायडेला सहजपणे नमवताना द्वितीय स्थान पटकावले. विश्वा विरुध्दची अनपेक्षित बरोबरी झाली नसती तर हरिकृष्नने सहजपणे विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले असते. त्याचवेळी तेजस्विनी सागर आणि भाविक भारांबे यांनी आपल्या अखेरच्या लढती बरोबरी सोडवल्याने त्यांना अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)