विश्व नेमबाजीत शाहू मानेचे मिश्रमध्ये ‘सुवर्ण’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 09:47 AM2022-07-14T09:47:02+5:302022-07-14T09:47:26+5:30
मेहुली घोषसह केली चमकदार कामगिरी
कोल्हापूर : कोरिया (चांगवान) येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना मेहुली घोष हिच्या साथीने १० मीटर एअर रायफल मिश्र या प्रकारामध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली.
पात्रता फेरीत शाहू व मेहुली यांनी सहभागी ३० संघांतील स्पर्धकांमध्ये सर्वाधिक ६३४.३० गुण पटकावीत प्रथम, तर हंगेरियन संघाने ६३०.३० गुण घेऊन पात्रता फेरीमध्ये द्वितीय स्थान पटकाविले. अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धक हंगेरी संघामधील ऑलिम्पियन ईस्तवान पेनी व ईस्तर मेसझारोस हे दोघे भारतीय खेळाडूंपेक्षा अनुभवी असल्याने त्याच्याकडून चांगली सुरुवात झाली. मात्र, शाहू व मेहुली यांनी यापूर्वीच्या स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर उत्कृष्ट खेळी करीत १७ विरुद्ध १३ अशी मात करीत सुवर्णपदक जिंकले.
भारतीय संघाच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या प्रशिक्षिका सुमा शिरुर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्य शाहूकडून ही मला भेट मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.