‘मिशन आॅलिम्पिक’साठी कोल्हापुरी बळ
By admin | Published: September 2, 2016 03:11 AM2016-09-02T03:11:23+5:302016-09-02T03:11:23+5:30
आॅलिम्पिकमधील कामगिरी ही प्रत्येक देशाच्या क्रीडाक्षेत्राची ओळख करून देत असते. भारताची ओळख भरीव आणि अग्रभागी ठेवण्यासाठी कोल्हापुरातील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
- प्रवीण देसाई, कोल्हापूर
आॅलिम्पिकमधील कामगिरी ही प्रत्येक देशाच्या क्रीडाक्षेत्राची ओळख करून देत असते. भारताची ओळख भरीव आणि अग्रभागी ठेवण्यासाठी कोल्हापुरातील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी ‘मिशन आॅलिम्पिक - २०४०’ मध्ये देशातून शंभर पदके पटकाविणे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून खेळाडू घडविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे.
सन २०४० आॅलिम्पिक्समध्ये भारताला १०० पदके मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी तयार केलेल्या ‘प्रीप्रायमरी स्कूल लेव्हल फिटनेस ट्रेनिंग’ या पथदर्र्शी प्रकल्पाच्या www.ppfns.in या संकेतस्थळाचे उद्घाटन या महिन्याच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते करण्यात आले.
भारताच्या आॅलिम्पिकच्या इतिहासात १८९६ ते २०१२ पर्यंत १८ आॅलिम्पिक स्पर्धेत २६ पदके मिळाली आहेत. एवढ्या बलाढ्य देशाला पदक का मिळत नाही, या अनुषंगाने विचार केल्यावर खेळाडूंची निवड प्रक्रिया व त्यांच्या निवडण्याचा वयोगट ही चुकीची पद्धत आहे. म्हणजेच निवड प्रक्रियेत १० ते १४ वर्षे वयोगटातील मुले निवडली जातात. ही निवड उशिरा केली जाते. कोवळ्या वयातच खेळाडूमध्ये हा स्टॅमिना वाढवून त्याच्या आवडीनुसार खेळात त्याला प्रोत्साहन दिल्यास ‘आॅलिम्पिक’च्या पदकापर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार नाही.
ही बाब लक्षात घेऊन मेजर सासने यांनी २०४० मध्ये भारताला १०० पदकांच्या नियोजनासाठी ‘प्रीप्रायमरी फिटनेस लेव्हल’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. हा देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प असून, कोल्हापूर जिल्'ातील शाळांमध्ये राबविला जाणार आहे. त्यानंतर तो देशातील कमीत कमी एक लाख शाळांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या प्रकल्पात मोटर क्वालिटीच्या टेस्ट असल्यामुळे लहान मुलांचे फिटनेस स्टँडर्ड लवकरच पालकांना व शिक्षकांना दिसून येणार आहे.
सरकारी शाळांत मोफत, तर खासगी शाळांमध्ये माफक शुल्क आकारले जाणार आहे. मुलाच्या सरावानंतर दोन वर्षांत तो कुठल्या गेममध्ये आॅलिम्पिकमध्ये खेळू शकेल हे त्याच्या शिक्षकांना व पालकांना सांगितले जाणार आहे. यात सहभागी होण्यासाठी शाळांना वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे.
भारतामध्ये खेळाडूंची निवड प्रक्रिया व त्यांचा निवडण्याचा वयोगट या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करून हा नवा पथदर्र्शी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
लहान मुलांना प्रीप्रायमरी स्कूल लेव्हलला खेळांचे ट्रेनिंग देण्याच्या उद्देशाने आम्ही हा प्रोग्रॅम प्लॅन तयार केला आहे.
- निवृत्त मेजर सुभाष सासने,
जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी, कोल्हापूर
अशी होणार संकेतस्थळावर नोंदणी
सन २०४० आॅलिम्पिक्समध्ये १०० पदकांसाठी ‘खेळ क्रांतीचा आगाज’ या प्रीप्रायमरी स्कूल लेव्हल फिटनेस ट्रेनिंग पथदर्र्शी प्रकल्पाच्या www.ppfns.in या संकेतस्थळावर जाऊन रजिस्टर करा व हे जे आहे लक्ष्य आहे, ते साध्य करण्यासाठी मदत करा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने
यांनी यावेळी केले.