कोल्हापूरचा अनिकेत प्रशिक्षणासाठी लंडनमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 08:37 PM2019-03-06T20:37:14+5:302019-03-06T20:38:46+5:30
कोल्हापूरच्या अनिकेत जाधवची इंग्लंडच्या ब्लॅकबर्न रोव्हर्स अकादमी संघासाठी निवड
मडगाव : फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणारा कोल्हापूरचा अनिकेत जाधव आता लंडन येथे विशेष प्रशिक्षणासाठी जाणार आहे. ब्लॅकबर्न रोव्हर्स फुटबॉल अकादमीने त्याची निवड केली असून येथे तो तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेणार आहे.
इंग्लंडच्या एका क्लबसाठी प्रशिक्षण शिबिरासाठी निवडण्यात आलेला हा पहिला भारतीय फुटबॉलपटू आहे. ब्लॅकबर्न रोव्हर्स हा संघ तीनवेळा इंग्लिश लीग आणि सहा वेळा प्रीमियर लीग स्पर्धा जिंकलेला आहे. या अकादमीस तेथील मॅन्चेस्टर युनायटेड, चेल्सा, आर्सेनल या फुटबॉल क्लब संघाबरोबरीचा दर्जा प्राप्त आहे.
ब्लॅकबर्न रोव्हर्स अकादमी ही इंग्लंड येथील उच्च दर्जाची फुटबॉल अकादमी आहे. अनिकेत हा इंडियन सुपर लीग स्पर्धेत जमशेदपूर फुटबॉल क्लब संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. अनिकेतच्या या निवडीबद्दल जमशेदपूर संघाचे मुकूल चौधरी म्हणाले की, एका भारतीय खेळाडूची निवड उच्च दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रात होणे ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. अनिकेत हा चांगला खेळाडू असून या शिबिरात त्याला फुटबॉलचे तांत्रिक प्रणालीचे प्रशिक्षणाचे धडे गिरविण्याची संधी प्राप्त होणार आहे.