कोलकाता नाईट रायडर्ससचा गंभीर विजय
By Admin | Published: April 24, 2016 11:23 PM2016-04-24T23:23:03+5:302016-04-24T23:23:03+5:30
थरारक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर २ विकेटने गंभीर विजय मिळवला. रायझिंग पुणे सुपरजायंट्सने दिलेले १६१ धावांचे आव्हान केकेआरने २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
>ऑनलाइन लोकमत
पुणे, २४ - शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर २ विकेटने गंभीर विजय मिळवला. रायझिंग पुणे सुपरजायंट्सने दिलेले १६१ धावांचे आव्हान केकेआरने २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. केकेआरकडून सूर्यकुमार यादवने तुफानी फलंदाजी करताना ४९ चेंडूत ६० धावांची खेळी केली. कर्णधार गंभीर (११) आणि रॉबिन उथप्पा (०) या सलामीवीराना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयश आले.
शाकिब अल हसन (३) रसेल (१७), सतिश (१०) हे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. स्फोटक युसुफ पठाणने मोक्याच्या क्षणी २७ चेंडूत ३६ धावांची उपयुक्त खेळी केली. पुण्याकडून मॉर्केल, भाटीया आणि परेरांनी प्रत्येकी २ फलंदाजाला बाद केले.
त्यापुर्वी, अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने गंभीरच्या कोलकाता नाईट रायडर्ससमोर १६१ धावांचे आव्हन ठेवले. रायझिंग पुणे सुपरजायंट्सने निर्धारित २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १६० धावा केल्या होत्या. मुंबईकर अजिंक्य रहाणे आज पुन्हा संघाच्या मदतीला धावून आला. कठीण परिस्थितीत त्यांने अर्धशतक केले. रहाणेने ५२ चेंडूचा सामना करताना ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ६७ धावांचा खेळी केली.
फाफ डू प्लेसीस (४) ला आज साजेशी खेळी करता आली नाही. स्मिथ आणि रहाणे यांनी ३ दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदीरू केली. दोघांचा जम बसला होता पण दुर्देवीरित्या स्मिथ धावबाद झाला. त्याने ३१ धावांची खेळी केली. परेरा आणि मॉरकेल यांनी प्रत्येकी ९ चेंडू खेळले आणि अनुक्रमे १२ , १६ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात धोनीने आक्रमक २३ धावांचा नाबाद खेळी केली. केकेआरकडून नरेन, शाकिब, यादव आणि सचिनने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.