कोरियाने भारताला रोखले

By admin | Published: October 23, 2016 03:16 AM2016-10-23T03:16:23+5:302016-10-23T03:16:23+5:30

अव्वल मानांकित भारतीय संघाला शनिवारी चौथ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या रॉऊंड रॉबिन लढतीत दक्षिण कोरियाने १-१ असे बरोबरीत रोखले.

Korea stops India | कोरियाने भारताला रोखले

कोरियाने भारताला रोखले

Next

कुआंटन (मलेशिया) : अव्वल मानांकित भारतीय संघाला शनिवारी चौथ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या रॉऊंड रॉबिन लढतीत दक्षिण कोरियाने १-१ असे बरोबरीत रोखले.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या भारतापुढे ११ व्या स्थानावर असलेल्या कोरियन संघाने आव्हान निर्माण केले. सामन्याच्या पहिल्या क्वार्टरला पिछाडवर पडल्यानंतर भारतीय गोलकिपर पी. आर. श्रीजेशने संघासाठी अनेक गोल बचावले. भारतीय खेळाडूने केलेल्या चुकीचा लाभ घेत जुआंग जून-वूने सामन्याच्या ११ व्या मिनिटाला कोरिया संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने बरोबरी साधण्यासाठी बराच प्रयत्न केला, पण अखेर ३३ व्या मिनिटाला भारताला त्यात यश मिळाले. ललित उपाध्यायने कोरियाची बचाव फळी भेदत संघाला बरोबरी साधून दिली. जेतेपदाचा दावेदार मानल्या जात असलेल्या भारतीय संघाच्या खात्यावर दोन सामन्यातून चार गुणांची नोंद आहे. रविवारी भारताला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. दोन सामने खेळणाऱ्या दक्षिण कोरियाच्या खात्यावर एक गुण आहे. शुक्रवारी त्यांना पाकिस्ताविरुद्ध अखेरच्या मिनिटाला पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)

उद्या महामुकाबला; भारत-पाक भिडणार
आपल्या पहिल्या सामन्यात जपानचा १०-२ अशा मोठ्या फरकाने नमविणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला रविवारी पाकिस्तानचे आव्हान आहे. पाक संघाला नमविणे एवढे एकच आव्हान भारतीय संघापुढे असल्याने हा ‘महामुकाबला’ चांगलाच रंगणार, यात शंका नाही. भारताने या स्पर्धेत आपल्या अभियानाच्या प्रारंभीच जपान संघाला १०-२ अशा मोठ्या फरकाने नमविले. तर दुसरीकडे पाकिस्तानला यजमान मलेशिया संघाविरुद्ध २-४ असा पराभव स्वीकारावा लागला होता. इतिहासावर नजर टाकल्यास भारत चॅम्पियन्स चषक स्पर्धेत सन २०११ साली विजेता बनला होता. पाकिस्तान संघाला पराभूत करीत भारताने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तर पाकिस्तान संघाने सन २०१२ साली भारताला पराभूत केले होते. शिवाय पाकिस्तानने २०१३ साली देखील या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. जपानचा संघ या स्पर्धेत उपविजेता राहिला होता. त्यानंतर मात्र दोन वर्षे या स्पर्धा झाल्याच नाहीत. 

Web Title: Korea stops India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.