कुंबळे संचालक तर प्रशिक्षकपदी द्रविड!
By admin | Published: March 13, 2017 03:40 AM2017-03-13T03:40:06+5:302017-03-13T03:40:06+5:30
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आता संघाचे संचालक होण्याची शक्यता आहे. प्रशासकांच्या समितीने कुंबळेकडे बीसीसीआयची मोठी जबाबदारी सोपविण्याची शिफारस केली आहे
मुंबई : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आता संघाचे संचालक होण्याची शक्यता आहे. प्रशासकांच्या समितीने कुंबळेकडे बीसीसीआयची मोठी जबाबदारी सोपविण्याची शिफारस केली आहे. समिती बीसीसीआयमध्ये मोठे फेरबदल करण्यास उत्सुक आहे. यानुसार कुंबळे यांच्याकडे टीम इंडियाचे संचालकपद सोपविण्यास उत्सुक असून, प्रशिक्षकपदी नव्या सदस्याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या पदासाठी राहुल द्रविड पहिली पसंती असल्याचे वृत्त आहे.
शास्त्री यांच्यानंतर संचालकपद रिक्त
शास्त्री यांचा करार संपुष्टात आल्यानंतर संचालकपद रिक्त आहे. आता हे पद कुंबळे यांच्याकडे सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.
विस्तृत अहवाल मागविला
प्रशासकांच्या समितीने अनिल कुंबळे यांना भारतीय क्रिकेट संघाचा विस्तृत अहवाल सोपविण्यास सांगितले आहे. त्यात ज्युनिअर क्रिकेट संघ आणि महिला क्रिकेट संघांचाही समावेश आहे. सल्लागार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे.
प्रशिक्षक म्हणून कुंबळे यांची अखेरची मालिका
कुंबळे यांच्याकडे संघाचे संचालकपद सोपविण्यात आले तर भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेली मालिका प्रशिक्षक म्हणून त्यांची अखेरची मालिका ठरू शकते. त्या पार्श्वभूमीवर राहुल द्रविड यांना प्रशिक्षकपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जात आहे.